Air India express flight  x
राष्ट्रीय

Air India flight return | तांत्रिक बिघाडामुळे जम्मूला चाललेले विमान मध्यातूनच दिल्लीला परतले...

Air India flight return | एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध केले पर्यायी विमान

पुढारी वृत्तसेवा

Air India Delhi-Jammu flight return

नवी दिल्ली : दिल्लीहून जम्मूच्या दिशेने निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX2564 या विमानाला सोमवारी उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने दिल्लीला परतावे लागले. यानंतर, प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी विमान उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी दिली.

प्रवक्त्यांनी काय सांगितले?

प्रवक्त्यांनी सांगितले की, “मूळ विमानात तांत्रिक अडचण आल्यामुळे दिल्ली-जम्मू विमानसेवा थांबवण्यात आली. त्याऐवजी पर्यायी विमानाद्वारे ही सेवा पूर्ण करण्यात आली.”

दरम्यान, रविवारी एअर इंडियाच्या तिरुवनंतपुरम–दिल्ली उड्डाणासही रद्द करण्यात आले. दिल्लीहून येणाऱ्या विमानाला पक्षी धडक दिल्याने तेथे सुरक्षित लँडिंग झाले. मात्र, या घटनेनंतर विस्तृत अभियांत्रिकी तपासणीसाठी पुढील उड्डाण रद्द करण्यात आले.

नॅरो-बॉडी विमानांच्या सेवांमध्ये तात्पुरती कपात

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात म्हटले, “तिरुवनंतपुरमहून दिल्लीला जाणारी एअर इंडिया फ्लाइट AI2455, दिनांक 22 जून 2025 रोजी, पक्षी धडकेच्या संशयावरून होणाऱ्या विस्तृत तपासणीमुळे रद्द करण्यात आली आहे.”

अशातच, एअर इंडिया कंपनीने अहमदाबाद दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपली स्थिरता राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 12 जून रोजी झालेल्या विमान अपघातात 270 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

त्यामुळे एअर इंडियाने आपल्या नॅरो-बॉडी (लहान आकाराच्या) विमानांच्या सेवांमध्ये तात्पुरती कपात करण्याचे ठरवले आहे.

19 मार्गांवरील 118 फ्लाईट्स कमी करणार

कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “एकूण नॅरो-बॉडी नेटवर्कच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी भागात कपात केली जाणार आहे. यात 19 मार्गांवरील आठवड्याच्या 118 फ्लाईट्स कमी करण्यात येणार असून 3 मार्गांवरील सेवा पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येत आहेत. ही कपात किमान 15 जुलै 2025 पर्यंत राहणार आहे.”

ही पावले उचलण्यात येण्यामागे उद्दिष्ट म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच कंपनीच्या सेवांचा दर्जा व सातत्य टिकवून ठेवणे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदाबाद अपघातानंतर DGCA कडून तिघांवर कारवाई

अहमदाबाद येथे झालेल्या भीषण एअर इंडिया अपघातानंतर, भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियामधील तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली आहे. या अधिकाऱ्यांना सेवेवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

या अधिकाऱ्यांनी अन्य उड्डाणांसाठी वैमानिकांच्या नियोजनात गंभीर त्रुटी केल्या होत्या. या चुकांचा थेट संबंध अपघाताशी नसला तरी, त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे DGCA ने कठोर पावले उचलत, या तिघांवर कारवाईची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT