नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये थंडीच्या लाटेमुळे गुरुवारी दृश्यमानता कमी झाली. किमान तापमान ७.४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने आणि धुके वाढल्याने सकाळी ८ वाजता दिल्लीतील दृश्यमानता २५० मीटर इतकी नोंदवली गेली. तसेच राष्ट्रीय राजधानीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 'गंभीर' श्रेणीत नोंदवला गेला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजता दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक ४४८ नोंदवला गेला. आनंद विहारमध्ये ४७८, अशोक विहार येथे ४७४, बवाना येथे ४६० आणि एक्यूआय नोंदवले गेले. याव्यतिरिक्त, भारतीय हवामान विभागानुसार, दिल्लीतील धुके आणखी दाट होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत शहरातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार मंगळवारी शहरात किमान तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे इथून पुढे थंडीची लाट काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीकरांना दरवर्षीप्रमाणे थंडी आणि प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील (एनसीआर) राज्यांना श्रेणीबद्ध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध अधिकाऱ्यांची समिती तयार करण्याचे आदेश दिले. दिल्ली-एनसीआरमध्ये खराब झालेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे श्रेणीबद्ध उपाय योजनांचा चौथा टप्पा लागू करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. ५ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यानंतर दिल्ली-एनसीआरमधील निर्बंध शिथिल करण्यास परवानगी दिली होती. मात्र, हवेची गुणवत्ता खालावल्याने सोमवारी चौथा टप्पा पूर्ववत करण्यात आला.