ai robots training india job loss viral post users angry
पुढारी ऑनलाईन : सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये एक महिला डोक्यावर कॅमेरा लावून घरातील विविध कामे करताना दिसते. हे काम करण्यासाठी तिला तासाला २५० रुपये मिळत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ती असे का करत आहे, याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचे मत आहे की हे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.
तुम्ही कधी विचार केला आहे का की भविष्यात आंबा कापणे, भाजी धुणे किंवा घराची साफसफाई यांसारखी रोजची कामे रोबोट करतील? अशा रोबोट्सना माणसांसारखे काम करता यावे यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. याच संदर्भातील एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
चेन्नईतील महिलेचे अनोखे काम
एएफपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, चेन्नईतील २५ वर्षीय नागीरेड्डी श्रीरामचंद्रा सध्या हे काम करत आहेत. त्या आपल्या स्वयंपाकघरात तासन्तास काम करतात; मात्र त्या स्वयंपाकाचे व्हिडिओ बनवत नाहीत. त्यांच्या डोक्यावर स्मार्टफोन बांधलेला असतो, जो त्यांच्या प्रत्येक हालचालीचे चित्रीकरण करतो.
विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडिया रील्ससाठी नसून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील डेटा कंपन्यांसाठी तयार केला जातो. या कंपन्या मशीनना वास्तविक जीवनात माणसे कशी काम करतात हे शिकवण्यासाठी हा डेटा वापरतात.
तासाला २५० रुपयांचे मानधन
या कामासाठी नागीरेड्डी यांना तासाला २५० रुपये मिळतात. त्या म्हणतात, “घरकाम करण्यासाठी तासाला २५० रुपये कोण देतं?” त्यांना अशीही आशा आहे की भविष्यात त्यांच्या घरी स्वतःचा रोबोट असेल.
ही केवळ एक घटना नसून भारतात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल श्रमबाजाराचे वास्तव आहे. अनेक लोक आपला वेळ आणि मेहनत वापरून पुढील पिढीतील एआय प्रणाली तयार करण्यात योगदान देत आहेत.
वाद का सुरू झाला आहे?
आतापर्यंत बहुतेक लोक एआयला मजकूर किंवा चित्रे तयार करणाऱ्या चॅटबॉट्सच्या स्वरूपात ओळखत होते. मात्र प्रत्यक्ष जगात काम करणाऱ्या रोबोट्सना वेगळ्या प्रकारच्या डेटाची गरज असते.
या रोबोट्सना ‘इगोसेंट्रिक डेटा’ लागतो, म्हणजेच माणसाच्या नजरेतून दिसणारे दृश्य. एखादे जड भांडे कसे उचलायचे, भाजी कशी चिरायची किंवा दैनंदिन कामे कशी करायची हे शिकण्यासाठी रोबोट्सना हजारो तासांचे मानवी फुटेज आवश्यक असते.
यासाठी अनेक कर्मचारी घरात, कारखान्यांत किंवा स्टुडिओमध्ये डोक्यावर कॅमेरे आणि मोशन सेन्सर्स लावून काम करतात. नागीरेड्डी सांगतात की रेकॉर्डिंग योग्य पद्धतीने होत नसेल, तर त्यांच्या उपकरणातून सूचना दिल्या जातात. उदाहरणार्थ, “हात कॅमेऱ्यात दिसत नाहीत, कृपया योग्य प्रकारे दाखवा,” असा इशारा दिला जातो.
अशा प्रकारे संकलित केलेला डेटा एआय कंपन्यांकडे पाठवला जातो, जेणेकरून रोबोट्सना मानवी काम करण्याचे कौशल्य शिकवता येईल.
लोकांना का वाटतेय भीती?
हे व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका वापरकर्त्याने याची तुलना “स्वतःचीच कबर खोदून त्यासाठी मजुरी मिळवण्याशी” केली. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “लोक स्वतःच तो फास तयार करत आहेत, जो भविष्यात त्यांच्या नोकऱ्या संपवेल.”
असंघटित कामगारांबाबतही चिंता
ही चिंता केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित नाही. नीती आयोगाच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की एआय आणि रोजगार यावरील चर्चा प्रामुख्याने व्हाइट-कॉलर नोकऱ्यांभोवती फिरते. मात्र भारतातील सुमारे ४९ कोटी असंघटित कामगारांवर एआयचा काय परिणाम होईल, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
बेंगळुरूमधील ५५ वर्षीय पोन्नी या फुलांचे गजरे तयार करतात आणि सध्या एआयसाठी डेटा संकलनाचे कामही करतात. त्या भविष्यातील परिस्थितीबाबत चिंतित आहेत. त्या म्हणतात, “पुढील पिढीला, जी कदाचित माझ्यासारखे काम करेल, अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.”