राष्ट्रीय

AI Poll Prediction 2026 : प. बंगालमध्ये ममतादीदींचा गड अभेद्य! तामिळनाडूत द्रमुकचा डंका; भाजपला आसामचाच आधार

Assembly election exit polls 2026 : केरळमध्ये मात्र राजकीय परंपरेला साजेसा बदल पाहायला मिळू शकतो

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा आता शांत झाला असून, संपूर्ण देशाचे लक्ष निकालांच्या निकालांकडे लागले आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता राजकीय विश्लेषकांसोबतच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) ने देखील आपले भाकीत वर्तवले आहे. चॅट जीपीटी, जेमिनी आणि ग्रोक यांसारख्या प्रगत एआय मॉडेल्सनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार, पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा करिश्मा कायम राहताना दिसत आहे, तर दक्षिण भारतात आणि ईशान्येत सत्तासंघर्षाचे रंजक चित्र समोर आले आहे.

प. बंगालमध्ये तृणमूलचेच वर्चस्व; भाजपची जोरदार मुसंडी

सर्वात जास्त लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये एआय एक्झिट पोलनुसार 'काटे की टक्कर' पाहायला मिळत असली, तरी सत्ता स्थापनेत तृणमूल काँग्रेस बाजी मारण्याची दाट शक्यता आहे. 'चॅट जीपीटी'ने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला १६० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला असून भाजपला ९० ते १२० जागा मिळतील असे म्हटले आहे.

दुसरीकडे, 'जेमिनी' एआयने तृणमूलला स्पष्ट बहुमताच्या दिशेने नेले असून त्यांना १७५ ते १९५ जागा मिळतील असा अंदाज दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी राबवलेल्या ग्रामीण भागातील कल्याणकारी योजना आणि महिला मतदारांचा पाठिंबा हा तृणमूलसाठी 'ट्रम्प कार्ड' ठरताना दिसत आहे. मात्र, शहरी भागातील वाढलेले मतदान आणि सत्ताविरोधी लाट ('अँटी इन्कबन्सी') याचा भाजपला फायदा होऊन त्यांच्या जागा ९५ ते ११५ पर्यंत पोहोचतील, असे जेमिनीचे विश्लेषण सांगते.

तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तेचे समीकरण

तामिळनाडूमध्ये द्रमुक (DMK) आघाडी आपले वर्चस्व कायम राखणार असल्याचे चित्र आहे. चॅट जीपीटीने डीएमके आघाडीला ११० ते १३५ जागांचा अंदाज दिला असला, तरी जेमिनी आणि परप्लेक्सिटी यांनी अनुक्रमे १४८ आणि १८५ पर्यंत जागा मिळतील, असे भाकीत वर्तवले आहे. अण्णा द्रमुक (AIADMK) आघाडीला येथे तगड्या विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मात्र राजकीय परंपरेला साजेसा बदल पाहायला मिळू शकतो. चॅट जीपीटी आणि जेमिनी या दोघांनीही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूडीएफ' (UDF) आघाडीला सत्तेच्या जवळ नेले आहे. मात्र, 'ग्रोक' (Grok) ने डाव्यांच्या 'एलडीएफ' (LDF) आघाडीला झुकते माप दिले असल्याने केरळचा निकाल चुरशीचा ठरणार हे स्पष्ट आहे.

आसाममध्ये भाजपची 'हॅट्ट्रिक'?

ईशान्येकडील महत्त्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचा विजयरथ रोखणे काँग्रेसला कठीण जाणार असल्याचे एआयचे सर्वच पोल्स सांगत आहेत. चॅट जीपीटीने ७५ ते ९५, तर जेमिनीने ८५ ते ९५ जागा भाजप आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. विकासकामे आणि हिंदुत्वाचा अजेंडा आसाममध्ये भाजपसाठी सत्तेचे हॅट्ट्रीक मिळवून देताना दिसत आहे.

पश्चिम बंगाल – AI एक्झिट पोल अंदाज

  • चॅट जीपीटी – तृणमूल 160-190 भाजप 90-120

  • जेमिनी - तृणमूल 175-195 भाजप 95-115

  • परप्लेक्सिटी – तृणमूल 155-225 भाजप 52-115

  • ग्रोक : तृणमूल 198-213 भाजप 64-82

तामिळनाडू : एआय एक्झिट पोल अंदाज

  • चॅट जीपीटी : डीएमके 110-135, एआयडीएमके 90-120, इतर 5-15

  • जेमिनी : डीएमके 148, एआयडीएमके 72, इतर 14

  • परप्लेक्सिटी : डीएमके 145-185, एआयडीएमके 38-70, इतर 6-28

  • ग्रोक : डीएमके 113-162, एआयडीएमके 52-140 इतर 5-24

आसाम – एआय एक्झिट पोल अंदाज

  • चॅट जीपीटी – भाजप+ 75-95 काँग्रेस+ 25-40

  • जेमिनी - भाजप+ 85-95 काँग्रेस+ 30-40

  • परप्लेक्सिटी – भाजप+ 85-100 काँग्रेस+ 25-40

  • ग्रोक - भाजप+ 90 काँग्रेस+ 20

केरळ – एआय एक्झिट पोल अंदाज

  • चॅट जीपीटी – यूडीएफ 70-80 एलडीएफ 55-70

  • जेमिनी - यूडीएफ 68-74 एलडीएफ 62-68

  • परप्लेक्सिटी – यूडीएफ 58-96 एलडीएफ 61-75

  • ग्रोक - यूडीएफ 51-65 एलडीएफ 74-88

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT