नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे १८–१९ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ची सांगता घोषणापत्र स्वीकारून झाली. ८८ देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी या घोषणापत्रास समर्थन देत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सहयोग, विश्वासार्हता, लवचिकता आणि कार्यक्षमतेवर आधारित जागतिक दृष्टीकोन मान्य केला.
‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या तत्त्वावर आधारित या घोषणापत्रात एआयचे लाभ मानवापर्यंत समप्रमाणात पोहोचावेत, यावर भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा सन्मान राखत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहुपक्षीय सहभाग वाढविण्याची भूमिका यात मांडण्यात आली.
सात प्रमुख स्तंभांवर भर
घोषणापत्रात जागतिक एआय सहकार्यासाठी सात ‘चक्र’ (स्तंभ) निश्चित करण्यात आले आहेत. त्यात संसाधनांचे लोकशाहीकरण, आर्थिक वाढ आणि सामाजिक हित, सुरक्षितता आणि विश्वासार्हता, विज्ञानासाठी एआय, सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रवेश, मानव भांडवल विकास तसेच लवचिक, कार्यक्षम आणि नाविन्यपूर्ण एआय प्रणालींचा समावेश आहे.
महत्त्वाच्या जागतिक उपक्रमांची घोषणा
समिटमध्ये अनेक स्वैच्छिक आणि सहकार्याधारित जागतिक उपक्रम जाहीर करण्यात आले. त्यामध्ये ‘चार्टर फॉर द डेमोक्रॅटिक डिफ्युजन ऑफ एआय’द्वारे संसाधनांना प्रोत्साहन, ‘ग्लोबल एआय इम्पॅक्ट कॉमन्स’ या व्यासपीठाद्वारे विविध देशांतील यशस्वी उपयोजनांची देवाणघेवाण, तसेच ‘ट्रस्टेड एआय कॉमन्स’द्वारे सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रणालींसाठी साधने व निकष उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. याशिवाय ‘इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ एआय फॉर सायन्स इन्स्टिट्यूशन्स’द्वारे वैज्ञानिक सहकार्य वाढविणे, ‘एआय फॉर सोशल एम्पॉवरमेंट प्लॅटफॉर्म’द्वारे सामाजिक सक्षमीकरणाला चालना देणे, तसेच कौशल्यविकास आणि पुनर्कौशल्य तत्त्वांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली.
‘एआय फॉर ऑल’चा भारताचा आग्रह
भारताने ‘एआय फॉर ऑल’चा नारा देत समता, सर्वसमावेशकता आणि जागतिक सहकार्याच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करण्याचे आवाहन केले. आर्थिक प्रगती, विज्ञान, सुशासन आणि सार्वजनिक सेवा वितरणात एआयची भूमिका अधिक व्यापक करण्यावर भर देण्यात आला