AI impact on Indian jobs : सध्या देशात सुमारे १९७ दशलक्ष (१९ कोटी ७० लाख) अशा नोकऱ्या आहेत ज्यांमध्ये दैनंदिन कामांचा समावेश होतो. मात्र भविष्यात या नोकऱ्या 'एआय' ऑटोमेशनमुळे स्वयंचलित केल्या जाऊ शकतात. तसेच ४६ दशलक्ष (४ कोटी ६० लाख) रोजगार असे आहेत ज्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उत्पादकता सुधारू शकते, असे एका नवीन संशोधनात समोर आले आहे. एआय आणि ऑटोमेशन रोजगारावर कसा परिणाम करू शकतात, कोणत्या कामगारांना या तंत्रज्ञानाचा फायदा होण्याची शक्यता आहे आणि कोणाला अधिक धोक्यांचा सामना करावा लागू शकतो, याबाबतचे संशोधन देशातील एआयमुळे रोजगार क्षेत्रापुढील आव्हाने आणि संधी यांवर प्रकाशझोत टाकते.
चेन्नई येथील ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सेंटर फॉर फायनान्स अँड इकॉनॉमिक्स रिसर्चने रविवार, ११ ऑक्टोबर रोजी "एआय, ऑटोमेशन अँड इंडियाज वर्कफोर्स: हू गेन्स, हूज एक्सपोज्ड, अँड हाऊ पॉलिसी कॅन शेप द फ्युचर" हा शोधनिबंध प्रसिद्ध केला. विद्या महांबरे, विवेक जाधव आणि विष्णू वेणुगोपालन यांनी लिहिलेल्या या शोधनिबंधात, एआय आणि ऑटोमेशन रोजगारावर कसा परिणाम करू शकतात, कोणत्या कामगारांना या तंत्रज्ञानाचा फायदा होण्याची शक्यता आहे आणि कोणाला अधिक धोक्यांचा सामना करावा लागू शकतो, याचे परीक्षण केले आहे.
या अभ्यासातील एक महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की, अहवालानुसार रोजच्या ठरलेल्या पद्धतीची कामे करणाऱ्या १९ कोटी ७ लाख कामगारांच्या नोकऱ्यांवर भविष्यात ऑटोमेशनचा (यंत्रांचा) प्रभाव पडू शकतो. याचा अर्थ या सगळ्याच नोकऱ्या लगेच बंद होतील असे नाही, पण AI मुळे देशातील किती मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाला फरक पडू शकतो, हे यावरून स्पष्ट होते. सुमारे १५ कोटी ५ लाख (१५०.५ दशलक्ष) कामगार किंवा काम करण्यास सक्षम असलेल्या लोकसंख्येच्या २४.६ टक्के लोक अशा व्यवसायांमध्ये आहेत जिथे एआयचा प्रभाव पडू शकतो. एआयमुळे कामात मदत मिळण्यापेक्षा, त्यांच्या काही कामांची जागा एआय घेण्याची शक्यता असलेल्या कामगारांची संख्या अधिक आहे.
सुमारे १९ कोटी ७ लाख (१९७ दशलक्ष) कामगार अशा नोकऱ्यांमध्ये आहेत जिथे नियमित स्वरूपाची कामे कालांतराने स्वयंचलित (ऑटोमेटेड) होऊ शकतात. याचा अर्थ या सर्व नोकऱ्या नष्ट होतील असा होत नाही, परंतु ऑटोमेशनमुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या मनुष्यबळाची व्याप्ती यातून स्पष्ट होते.
रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, "एआयमुळे ८ टक्क्यांपेक्षा कमी नोकरी करणारे लोक एआय-पूरक व्यवसायांमध्ये असले, तरी भारताकडे असणारे मोठे मनुष्यबळ एआय साधनांचा प्रभावी वापर करून क्षेत्रातील तज्ज्ञ ज्ञानाच्या आधारे थेट उत्पादकता वाढवू शकते."
हा अभ्यास रोजगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुण भारतीयांसमोरील आव्हानेदेखील अधोरेखित करतो. २०२५ मध्ये १५ ते ६४ वयोगटातील २ कोटींहून अधिक (२० दशलक्षाहून अधिक) भारतीय बेरोजगार होते; यामध्ये १५ ते ३४ वयोगटातील १ कोटी ८७ लाख (१८.७ दशलक्ष) लोकांचा समावेश होता. २० ते २९ वयोगटातील पदवीधरांमधील बेरोजगारीचा दर एकूण दराच्या दुप्पट होता, तर अभियांत्रिकीची पदवी असलेल्यांपैकी २५ टक्के लोक बेरोजगार होते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
१५ ते २४ वयोगटातील नोकरी करणाऱ्या सुमारे ३९.४% तरुण अशा नोकऱ्यांमध्ये आहेत, जिथे दररोज एकाच साच्याची (नियमित) कामे असतात. शहरी भागात तर हे प्रमाण ५५% एवढे मोठे आहे. त्यामुळे AI आणि तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचा सर्वाधिक फटका शहरातील तरुण कामगारांना बसू शकतो.
अहवालानुसार, AI चा फटका महिला आणि पुरुषांवर वेगवेगळ्या प्रकारे बसेल. AI मुळे ज्या क्षेत्रांत बदल होत आहेत, तिथे पुरुषांच्या तुलनेत महिला अशा नोकऱ्यांमध्ये जास्त आहेत जिथे AI त्यांचे काम हिरावून घेणार नाही, तर त्यांच्या कामात मदत करेल. एआयचा प्रभाव असलेल्या कामगारांमध्ये, महिलांचे ३७.६ टक्के काम एआय-पूरक होते, तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण २८.४ टक्के होते. शहरी भागात, नोकरी करणाऱ्या महिलांपैकी १९.५ टक्के महिला एआय-पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत होत्या, तर नोकरी करणाऱ्या पुरुषांमध्ये हे प्रमाण १४.५ टक्के होते.
"महिलांच्या बाबतीत, एआयचा (AI) प्रभाव असलेल्या रोजगाराचा दर्जा पुरुषांच्या तुलनेत अधिक चांगला आहे; याचे कारण म्हणजे त्यांचे काम प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील 'नॉन-रुटीन' (एकाच प्रकारचे काम वारंवार न करावे लागणाऱ्या) स्वरूपाचे आहे," असे अहवालात नमूद केले आहे. तरीही, महिलांचा सशुल्क रोजगारातील सहभाग ही चिंतेची बाब आहे. २० ते २९ वयोगटातील केवळ १८ टक्के महिला सशुल्क रोजगारात होत्या, तर याच वयोगटातील पुरुषांचे प्रमाण सुमारे ७९ टक्के होते.
अहवालानुसार, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये AI मुळे नोकरीवर होणारा परिणाम भिन्न असणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये एआयचा प्रभाव वेगवेगळा आढळला (कंसात टक्केवारी). यामध्ये कामगारांमध्ये एआयचा सर्वाधिक प्रभाव केरळमध्ये (४२) दिसून आला. त्यानंतर हरियाणा (३७.९), तामिळनाडू (३२.९ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण सर्वात कमी (१६.१) आहे.
अहवालानुसार, हिमाचल प्रदेशातील सुमारे ४३.३ टक्के कामगारांना AI मुळे नोकरी जाण्याची भीती नाही, तर उलट त्यांच्या कामात तंत्रज्ञानाची मोठी मदत होणार आहे. याउलट उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मात्र चित्र चिंताजनक आहे. इथे AI माणसांच्या कामाची जागा घेण्याची, म्हणजेच नोकऱ्या हिरावली जाण्याची शक्यता इतर राज्यांपेक्षा खूप जास्त आहे. पंजाबमध्ये रोजच्या ठराविक साच्यातील (रुटीन) कामे करणाऱ्या कामगारांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ४४.६ टक्के आहे. भविष्यात ही सगळी कामे संगणक किंवा यंत्रांद्वारे (ऑटोमेशन) केली जाण्याची शक्यता असल्यामुळे, पंजाबमधील मोठ्या मनुष्यबळावर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
AI मुळे नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली असली, तरी यामुळे कामाचा वेग आणि उत्पादकता वाढण्याची मोठी संधीही उपलब्ध झाली आहे. एआयच्या रोजगारावर होणाऱ्या परिणामांवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावरही संशोधनात भाष्य करण्यात आले आहे.
भारताने आपल्या मनुष्यबळाला नव्या तंत्रज्ञानासाठी वेळेत तयार करणे अत्यंत गरजेचे आहे.
शाळांमध्ये AI शिक्षणाचा समावेश करावा.
AI साधने सर्वांना सहज उपलब्ध करून द्यावीत.
तरुणांसह दररोज एकाच साच्यात काम करणाऱ्या कामगारांना नवीन तंत्रज्ञानाचे विशेष प्रशिक्षण द्यावे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, AI आणि ऑटोमेशनचा रोजगारावर नेमका चांगला की वाईट परिणाम होतो हे पूर्णपणे समोर येण्यासाठी काही काळ जावा लागेल. कारण वेगवेगळ्या कंपन्या आणि क्षेत्रांमध्ये हे तंत्रज्ञान स्वीकारण्याचा वेग वेगवेगळा आहे. AI तंत्रज्ञानाचा खर्च कमी होणे, कामगारांचे कौशल्य वाढणे आणि कंपन्यांनी याचा वापर कसा करावा हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. तरीही, संकट समोर येईपर्यंत फक्त वाट न पाहता आत्तापासूनच योग्य पावले उचलणे आवश्यक असल्याचा इशाराही नवीन संशोधन देते.