राष्ट्रीय

AI and Cybersecurity Jobs : एआय, सायबर सिक्युरिटीत रोजगार संधी : टेक कंपन्यांतील एकूण रोजगारात ३० टक्के वाटा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : डिजिटल अर्थव्यवस्थेचा वेगाने होत असलेला विस्तार, जागतिक क्षमता केंद्रांची (जीसीसी) वाढती संख्या यामुळे टेक कंपन्यांमधील रोजगारनिर्मिती वाढत आहे. एकूण भरतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा आणि सायबर सिक्युरिटीचा वाटा जुलै ते सप्टेंबरमध्ये २५.८ वरून ३०.३ टक्क्यांवर गेला आहे.

एआयचा वापर करू शकणाऱ्या, डेटा व्यवस्थित हाताळू शकणाऱ्या आणि संगणकीय प्रणालीची सुरक्षा मजबूत करू शकणाऱ्या मनुष्यबळाची मागणी ‘जीसीसी’कडून वाढली असल्याचे क्वेस कॉर्पच्या अहवालात म्हटले आहे. एआय आणि माहिती विश्लेषण करू शकणाऱ्या व्यक्तींची मागणी १४ टक्क्यांनी वाढली आहे. सायबर सुरक्षा आणि धोका व्यवस्थापन पदांच्या मागणीतही सुमारे १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘जीसीसी’ची एकूण मनुष्यबळाची मागणी साडेतीन टक्क्यांनी घटूनही या पदांची मागणी वाढती आहे.

तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील ‘जीसीसी’मध्ये एआय आणि जनरेटिव्ह एआय कौशल्यांची आवश्यकता असलेल्या नोकरीच्या जाहिरातींचे प्रमाण सुमारे ३२ टक्के इतके नोंदवले गेले आहे. फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रात हे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढून सुमारे २३ टक्क्यांवर गेले आहे. तर, व्यावसायिक सेवा आणि कन्सल्टिंग क्षेत्रात चार टक्के अंकांची वाढ होऊन ते सुमारे २२ टक्क्यांवर वर पोहोचले आहे.

दुसरीकडे, टेलिकॉम आणि नेटवर्क्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्रियल, तसेच बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रांत, एकूण तंत्रज्ञानविषयक भरतीमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत अनुक्रमे सुमारे २४, ९ आणि ८ टक्के इतकी घट झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT