AI Pudhari
राष्ट्रीय

AI Agents Cybersecurity Threat: AI एजंट्सचा नवा धोका! भारतीय कंपन्यांचा गोपनीय डेटा उघड; CERT-In चा गंभीर इशारा

‘सर्ट-इन’चा संस्थांना अतिदक्षतेचा इशारा; ‘सर्ट-इन’ने जारी केला अहवाल

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: भारताची सायबर सुरक्षा संस्था ‘सर्ट-इन’ने स्वायत्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंटस्‌च्या वाढत्या धोक्याबाबत गंभीर इशारा जारी केला आहे. अनधिकृत एआय एजंटस्‌नी भारतीय संस्थांच्या लाईव्ह सिस्टीम्समध्ये शिरकाव करून गोपनीय डेटा चोरल्याचे उघडकीस आले असून सायबर गुन्हेगार ओपन सोर्स एआय टूल्सचा गैरवापर करून देशातील पायाभूत सुविधांवर वेगाने हल्ले करत आहेत.

‘सर्ट-इन’ने जारी केलेल्या सीआयएडी २०२५-००४९ या अहवालानुसार, अनेक कंपन्यांनी ॲप्लिकेशन कॉन्फिगरेशन, पब्लिक कोड रिपॉझिटरीज आणि क्लाऊड सर्व्हिसेसमध्ये लॉगिन क्रेडेंशियल्स आणि पासवर्डस्‌ उघडे ठेवले होते.

टेस्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या एआय मॉडेल्सनी याच कमकुवत सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेत भारतीय संस्थांच्या सिस्टीममध्ये प्रवेश केला आणि गोपनीय व्यावसायिक नोंदी वाचल्या.

धक्कादायक बाब म्हणजे, कोणत्याही भारतीय संस्थेला या डेटाचोरीचा सुगावा लागला नाही. जेव्हा एआय मॉडेल पुरवठादारांनी स्वतः अंतर्गत पुनरावलोकन करून माहिती दिली, तेव्हाच हा प्रकार उघडकीस आला.

आर्थिक हेतूने सायबर गुन्हेगारांकडून एआय टूल्सचा होतोय गैरवापर

संशोधन मॉडेल्सव्यतिरिक्त, व्यावसायिक सायबर गुन्हेगार ओपन सोर्स एआय साधनांचा वापर करून भारतीय संस्थांवर आर्थिक फायद्यासाठी सायबर हल्ले करत आहेत. ज्या संस्थांनी आपल्या सुरक्षेतील त्रुटींची केवळ अर्धवट दुरुस्ती केली, त्यांच्यावर काही दिवसांतच अधिक मोठ्या प्रमाणावर पुन्हा हल्ले झाल्याचे आढळून आले आहे.

‘सर्ट-इन’ने सर्व संस्थांना सोर्स कोड, कॉन्फिगरेशन फाईल्स आणि क्लाऊड स्टोअरेजचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. उघडे पडलेले क्रेडेंशियल्स तत्काळ बदलणे, जुने व चाचणी एपीआय बंद करणे, मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करणे आणि सायबर हल्ल्यांचे किमान १८० दिवस लॉग ठेवणे बंधनकारक केले आहे.

कॅस्परस्कीचे भारत प्रमुख जयदीप सिंग यांनी स्पष्ट केले की, एआय एजंटस्‌ आता केवळ कामाची गती वाढवणारे साधन राहिलेले नसून ते हल्ल्याचे मोठे माध्यम बनले आहेत. रिसर्च आणि टेस्टिंगसाठी वापरले जाणारे एआय एजंटस्‌ नेहमी सुरक्षित ‘सँडबॉक्स’ वातावरणात ठेवावेत आणि कोणत्याही महत्त्वाच्या कारवाईपूर्वी मानवी मंजुरी घेणे बंधनकारक करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT