प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo.
राष्ट्रीय

Ahmedabad plane crash | ‘पायलटची चूक’च्या वृत्तांवर परदेशी माध्यमांना कायदेशीर नोटीस

वैमानिक संघटना आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एअर इंडियाच्या विमान अपघाताला वैमानिकांची चूक जबाबदार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी फेडरेशन ऑफ इंडियन पायलटस् (एफआयपी) या वैमानिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेने ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांना कायदेशीर नोटीस बजावली असून, अधिकृत चौकशी पूर्ण होण्याआधीच निराधार वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल माफी मागण्याची मागणी केली आहे.

अशा प्रकारची निराधार आणि निवडक माहिती प्रसिद्ध करणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे, असे संघटनेने म्हटले आहे. या वृत्तांमुळे मृत वैमानिकांची मोठी बदनामी झाली आहे, जे स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असून, इतर वैमानिकांचेही मनोधैर्य खच्ची होत आहे, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (एएआयबी) आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळानेदेखील (एनटीएसबी) या वृत्तांना ‘अकाली आणि अटकळींवर आधारित’ म्हटले आहे. एएआयबीच्या प्राथमिक अहवालानुसार, अपघाताच्या काही क्षण आधी विमानातील इंधन पुरवठा नियंत्रित करणारे स्विच ‘रन’वरून ‘कटऑफ’ स्थितीत गेले होते.

तपासावर घाईघाईने निष्कर्ष नको; एनटीएसबीचे आवाहन

एअर इंडियाच्या विमान 171 च्या भीषण अपघाताच्या तपासात, कॅप्टनने चुकून महत्त्वाचे फ्युएल स्विचेस दाबल्याच्या मीडिया वृत्तांदरम्यान अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या (एनटीएसबी) प्रमुख जेनिफर होमेंडी यांनी घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढण्याविरुद्ध इशारा दिला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये होमेंडी म्हणाल्या, अशा मोठ्या तपासांना वेळ लागतो. त्यांनी कोणत्याही प्रकाशनाचे नाव न घेता अलीकडील वृत्तांना ‘अकाली आणि अटकळींवर आधारित’ म्हटले आहे. या टप्प्यावर निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

12 जून रोजी झालेल्या या अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला होता. भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरोचे (एएआयबी) तपास पथक, एनटीएसबीच्या मदतीने बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाची इंजिन शक्ती टेकऑफनंतर लगेच कशी कमी झाली, याचा तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT