Ahmedabad plane crash viral video |
नवी दिल्ली : गुजरातची राजधानी अहमदाबादहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान एका रूग्णालयाच्या होस्टेलवर कोसळले. त्यात २६१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी पाहणी आणि मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेले नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठलीये. घटनास्थळावर पाहणी करतानाचा व्हिडिओ नायडूंनी शेअर केला आहे. रिल्स फॉर्मेटमध्ये शेअर केलेल्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर नेटीझन्सनी टीका केली आहे. ही तर इन्फ्लुएन्सर संस्कृती झाली, अशा प्रतिक्रिया उमटत आहे. (Ahmedabad plane crash)
केंद्रीय मंत्री राम मोहन रायडूंनी कधी व्हिडिओ शेअर केला?
या गंभीर आणि दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. विजयवाडाहून अहमदाबादला पोहोचल्यानंतर नायडू यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. रात्री उशिरा त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, या गंभीर घटनेच्या व्हिडिओला लावलेले पार्श्वसंगीत (म्युझिक) आणि व्हिडिओ एडिटिंग यावर अनेकांनी आक्षेप घेतला.
हे नाटक कशासाठी? सोशल मीडियावर ट्रोल
एका विनाशकारी अपघाताच्या ठिकाणी, जिथे शेकडो निष्पाप जीवांचा अंत झाला, अशा ठिकाणच्या व्हिडिओला संगीत लावणे हे अत्यंत असंवेदनशील आणि दुःखद घटनेचे गांभीर्य कमी करणारे असल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात असून 'अरे २००-४०० लोक मरत राहतील, सहानुभूती-जबाबदारी-न्याय हे सगळं बकवास आहे, आधी माझी रील बनवा,' असे एका वापरकर्त्यांना त्यांच्या पोस्टला उद्देशून लिहिले आहे. 'एका मंत्र्याचे दयनीय वर्तन... शून्य जबाबदारी असलेली प्रभावशाली संस्कृती', 'हे नाटक कशासाठी? रील्स बनवणे आणि एडिटिंग करणे घृणास्पद आहे. फक्त तुमचे काम करा. जाहिराती करणे आणि अशा गोष्टी पोस्ट करणे थांबवा. हे रील्स बनवणे खरोखर आवश्यक आहे का? ही काळाची गरज आहे का?' अशा संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या पोस्टला दिल्या जात आहेत.