Ahmedabad plane crash
अहमदाबाद : नेहमीच्या सवयीनेच त्या दिवशी मी विमान जात असताना व्हिडीओ बनवत होतो; पण अवघ्या २४ सेकंदांत ते विमान कोसळले. ते पाहून मी खूप घाबरलो... असे भीषण विमान दुर्घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद करणारा १७ आर्यनने सांगितले. तर या अपघाताने रात्री त्याला झोप लागत नाही, या भागात राहायचं नाही, असं एकच पालुपद त्यानं लावलंय, असं त्याची बहीण सांगते.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान उंची गमावत हळूहळू आगीच्या लोळात रूपांतरित होण्याचे दृश्य... एका १७ वर्षीय मुलाच्या मोबाईल मध्ये अपघाताने कैद झाले. आर्यन असारी या मुलाचे नाव आहे. आर्यनने, शनिवारी अहमदाबाद पोलिसांना आपला जबाब नोंदवला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मी जे पाहिले त्यामुळे खूप घाबरलो होतो. माझ्या बहिणीने माझा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिला, तिने नंतर माझ्या वडिलांना माहिती दिली. विमान खूप जवळून जात होते, म्हणून मी माझ्या मित्रांना दाखवण्यासाठी व्हिडिओ शूट करण्याचा विचार केला. विमान खाली गेले आणि विमानतळ जवळ असल्याने मला वाटले की ते उतरणार आहे. पण जेव्हा ते खाली पडले तेव्हा आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. आम्ही पाहिले की त्यात स्फोट झाला आहे, असे या १७ वर्षीय मुलाने सांगितले. आर्यनने सांगितले की, त्याने चित्रीकरण सुरू केल्यानंतर २४ सेकंदांत हा अपघात घडला.