तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकाराचा मुद्दा हा चीन-भारत संबंधांमधील एक काटा' बनला आहे. तिबेटच्या मुद्द्यामुळेच दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांत तणाव निर्माण झाला आहे, असे नवी दिल्लीतील चिनी दूतावासाने रविवारी (दि. १३) म्हटले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उद्यापासून (दि. १५) चीन दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी नवी दिल्लीतील चिनी दूतावासाने केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये कोणाचेही नाव न घेता म्हटले आहे की, "भारतातील काही लोकांनी दलाई लामांच्या पुनर्जन्मावर अयोग्य टिप्पणी केली आहे. परराष्ट्र धोरणातील तज्ज्ञ म्हणून त्यांना 'शिजांग' (तिबेट) संबंधित मुद्द्यांच्या संवेदनशीलतेबद्दल पूर्ण जाणीव असायला हवी." तिबेटसाठी 'शिजांग' या चिनी नावाचा वापर करत यू जिंग यांनी म्हटलं आहे की, "दलाई लामांचा पुनर्जन्म आणि उत्तराधिकार हा पूर्णपणे चीनचा अंतर्गत विषय आहे. 'शिजांग' संबंधित मुद्दा चीन-भारत संबंधांमध्ये एक काटा बनला असून भारतासाठी एक ओझे ठरला आहे. 'शिजांग कार्ड' खेळणे हे निश्चितच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे असेल, असा फुशारकीही त्यांनी मारली आहे.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दलाई लामांच्या ९०व्या वाढदिवसाच्या सोहळ्यादरम्यान म्हटले होते की, एक बौद्ध अनुयायी म्हणून, केवळ आध्यात्मिक गुरू आणि त्यांच्या कार्यालयालाच त्यांच्या पुनर्जन्मावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे त्यांचे मत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दलाई लामांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी, म्हणजेच ४ जुलै रोजी स्पष्ट केले होते की, भारत श्रद्धा आणि धार्मिक प्रथांशी संबंधित बाबींवर कोणतीही भूमिका घेत नाही किंवा टिप्पणी करत नाही. आपल्या वाढदिवसाच्या सोहळ्यापूर्वी, दलाई लामांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीत चीनची कोणतीही भूमिका असणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याला चीनची मंजुरी घेणे आवश्यक असेल, असे चीनने म्हटलं होते.
परराष्ट्र मंत्री जयशंकर हे १५ जुलै रोजी उत्तर चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) प्रादेशिक सुरक्षा परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते काही द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. वर्ष २०२० मध्ये सीमेवर झालेल्या लष्करी संघर्षानंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. या संघर्षात किमान २० भारतीय आणि चार चिनी सैनिक ठार झाले होते. दरम्यान, गेल्या महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीव्यतिरिक्त आपल्या चिनी समकक्षांशी चर्चा केली होती.