मांजर्डे : उत्तर प्रदेश येथील आग्रा शहरामध्ये गुरुवारी दुपारी गलाईचा व्यवसाय सुरू असलेल्या एका दुकानात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. या घटनेत पुणदी (ता. तासगाव) येथील दुकान मालक सुनील पतंग पाटील (वय 42) व एक कामगार अशा दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य तिघेजण गंभीर जखमी आहेत. जखमीची नावे समजू शकली नाहीत.
सुनील पाटील यांनी आग्रा शहरात 20 वर्षांपूर्वी सोने-चांदी गलाई व टंच काढण्याचा व्यवसाय सुरू केला होता. गुरुवारी दुपारी पाटील व कामगार भट्टीवर चांदी गाळण्याचे काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक सिलिंडर गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. यामध्ये सुनील पाटील व अन्य एक कामगार (नाव समजले नाही) यांचा मृत्यू झाला. दुकानात असणार्या दोन ते तीन गॅस टाक्यांचा एकाच वेळी स्फोट झाला. या घटनेत सुनील पाटील यांच्या शरीराचे तुकडे झाले. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्यांचा मृतदेह सापडला आहे. तिसर्या मजल्यावरून पडल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील एका कामगार तरुणाचा मृत्यू झाला आहे. यावेळी अन्य दोन कामगार व एक चहा विक्रेता दुकानाच्या बाहेर असल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.