पुढारी वृत्तसेवा: देशभरातील निवडणूक प्रक्रियेवरून विरोधी पक्ष आणि नेत्यांनी वारंवार केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. या टीकेनंतर आयोगाने मोठं पाऊल उचलले आहे. या संदर्भातील आयोगाने सर्व पक्षांना आज (दि.११) नोटीस दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय आणि राज्यातील राजकीय पक्षांकडून कोणत्याही निराकरण न झालेल्या समस्यांसाठी 30 एप्रिलपर्यंत सूचना मागवल्या आहेत. स्थापित कायद्यानुसार निवडणूक प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी परस्पर सोयीस्करवेळी पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ सदस्यांनी आयोगासोबत चर्चेसाठी येण्याच्या सूचना देखील देण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह निवडणूक याद्यांतील घोळाबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करत या संदर्भात चर्चेची मागणी केली होती. तसेच या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची देखील भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचा विचार करून केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना सूचना मागवत भेटीचे आमंत्रण दिले आहे.
निवडणूक आयोगाने यासंबंधीच्या निवेदनात म्हटले की, संवाद साधण्याच्या आमंत्रणासाठी राजकीय पक्षांना वैयक्तिक पत्र जारी केले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणूक आयोगाच्या परिषदेत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सीईओ, डीईओ आणि ईआरओएसना राजकीय पक्षांशी नियमित संवाद साधण्याचे निर्देश दिले होते. राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या कोणत्याही सूचनांचे कायदेशीर चौकटीत काटेकोरपणे निराकरण करण्याचे आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत आयोगाला कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाने राजकीय पक्षांना विकेंद्रित सहभागाच्या या यंत्रणेचा सक्रियपणे वापर करण्याचे आवाहनही केले असल्याचे आयोगाने निवेदनात म्हटले आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या २८ भागधारकांपैकी राजकीय पक्ष हे एक प्रमुख भागधारक आहेत. लोकप्रतिनिधी कायदा १९५० आणि १९५१; मतदार नोंदणी नियम, १९६०; निवडणूक नियमांचे आचरण, १९६१; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचना, नियमावली आणि हस्तपुस्तिका यानुसार मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी एक विकेंद्रित, मजबूत आणि पारदर्शक कायदेशीर चौकट स्थापित केली आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षाकडून देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी मतदार याद्यांचा मूद्दा संसदेत उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मंगळवारी, बिजू जनता दलाचे (बीजेडी) शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेट दिली. त्यांनी २०२४ च्या ओडिशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतांमधील फरकांबाबत भारतीय निवडणूक आयोगाला एक पाठपुरावा निवेदन सादर केले.