नवी दिल्ली; पीटीआय : अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध होऊ देणार नाही, असे आश्वासन अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्तकी यांनी दिले आहे.
अफगाणिस्तानचे तालिबान सरकारमधील परराष्ट्रमंत्री मुत्तकी यांनी शुक्रवारी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पाकिस्तानला इशारा दिला. अफगाण भूमीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध केला जाणार नाही. या चर्चेत सुरक्षा सहकार्य, सीमापार दहशतवाद, व्यापार आणि अफगाणिस्तानसोबत भारताची सुरू असलेली विकास भागीदारी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
मुत्तकी यांनी प्रादेशिक स्थिरतेसाठी अफगाणिस्तानच्या वचनबद्धतेबद्दल सांगितले. आम्ही सुरक्षा सहकार्यावर सविस्तर चर्चा केली. आम्ही अफगाण भूमीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध होऊ देणार नाही. दोन्ही देश या विषयावर संपर्कात राहतील, असे ते म्हणाले. मुत्तकी यांनी अफगाणिस्तानातील सीमापार कारवायांवरून पाकिस्तानलाही कडक इशारा दिला. आम्ही पाकिस्तान सरकारला इशारा देऊ इच्छितो की, अशा द़ृष्टिकोनातून समस्या सुटणार नाहीत.
या बैठकीत जयशंकर यांनी सीमापार दहशतवादाच्या सामायिक आव्हानावर भाष्य करत पाकिस्तानला एक अप्रत्यक्ष संदेश दिला. विकास आणि समृद्धीसाठी आपली सामायिक वचनबद्धता आहे; तथापि आपले दोन्ही देश ज्या सीमापार दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करत आहेत, त्यामुळे या गोष्टी धोक्यात आल्या आहेत. दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि स्वरूपांचा सामना करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले. त्यांनी भारताच्या सुरक्षेच्या चिंतांबद्दल अफगाणिस्तानने दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.
मुत्तकी यांनी सर्व देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याच्या अफगाणिस्तानच्या इच्छेबद्दल सांगितले. अफगाणिस्तानने सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी संतुलित द़ृष्टिकोन स्वीकारला आहे. भारताला हे संबंध पुढे नेण्याची चांगली संधी आहे, असे ते म्हणाले. एकतर्फी द़ृष्टिकोनातून शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी प्रादेशिक सहकार्यासाठी तालिबानची असलेली आवश्यकता अधोरेखित केली.