पुढारी ऑनलाईन डेस्कः पेरीयार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्या पक्षाचे आदर्श आहेत. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरुनच आमच प्रवास होत राहील. तामिळनाडू राज्यात न्यायालये व मंदिरे याठिकाणी तमीळ भाषा सक्तीची केली जाईल तसेच राज्यपाल हे पद हटवणे हा आमच्या पक्षाचा अजेंडा असेल असे मत तमिळ अभिनेते आणि तमीलगा वेट्री कझागम (टीव्हिके) पक्षाचे प्रमुख विजय यांनी व्यक्त केले.
आज दि. २७ ऑक्टोबर रोजी विल्लुपूरम जिल्ह्यात त्यांच्या पक्षाची पहिली सभा झाली. तामिळनाडू २०२६ मध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विजय यांनी ही रॅली आयोजित केली होती. पुढे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधताना आपल्या पक्षाची ध्येय धोरणे स्पष्ट केली. आमचा पक्ष हा मातीशी जोडलेल्या लोकांसाठी काम करेल असा विश्वास व्यक्त केला. पेरीयार यांच्या तत्वज्ञानाला अनुसरुनच हा पक्ष वाटचाल करणार आहे. सर्व धर्मांच्या पंरपराचा आम्ही आदर करणार त्याचबरोबर महिला शिक्षण व सशक्तीकरण , सामाजिक न्याय याबाबत आम्ही कार्य करणार. त्याचबरोबर संविधानाचे रचनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे टिव्हीके पक्षाचे आदर्श राहतील असेही त्यांनी सांगितले.
मेगा स्टार विजय यांनी पुढे सांगितले की आमचा पक्ष इतिहासात ज्यांचे नाव अजरामर झाले अशा महिलांनाही अभिवादन करेल. यामध्ये ब्रिटीश वसाहतवादाला विरोध करणाऱ्या पहिल्या महिला वेलू नाचियार, सामाजिक चळवळीतील अंजलाई अम्मल यांच्या आदर्शाचे पालन करणार आमचा पहिला राजकीय पक्ष असेल. त्याचबरोबर महिलांना सर्वच क्षेत्रात समान संधी दिली जाईल, जातनिहाय जनगणना केली जाईल, शिक्षण व्यवस्थेची पुर्नव्यवस्थापन केले जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले. विल्लुपूरम जिल्ह्यात झालेल्या त्यांच्या या पहिल्या सभेला विजय यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. लाखोंच्या संख्येने या सभेला जनसमुदाय उपस्थित होता.