छत्तीसगड : राज्यातील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अबुझमाडच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात आज (दि.२६) झालेल्या भीषण चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाकडून अबुझमाडच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान, जवानांचा नक्षलवाद्यांशी सामना झाला आणि दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू झाला. चकमकीनंतर परिसरात राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान (सर्च ऑपरेशन) या दोन्ही महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांच्या हाती लागले.
घटनास्थळाची पाहणी केली असता, मृतदेहांजवळून एक रायफल, काही इतर शस्त्रे, वैद्यकीय साहित्य आणि दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. परिसरात अजूनही चकमक सुरूच असून, आणखी काही नक्षलवादी सुरक्षा दलाच्या निशाण्यावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.