नवी दिल्ली : देशात दुचाकींमुळे होणार्या जीवघेण्या अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या मोटारसायकल आणि स्कूटरमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) बंधनकारक करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून केली जाणार असून यासंदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे रस्त्यांवरील सुरक्षितता वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
सध्या 125 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी वाहनांसाठी एबीएस अनिवार्य आहे. एबीएस प्रणाली अचानक आणि हार्ड ब्रेकिंगदरम्यान चाक लॉक होण्यास अथवा अचानक वाहन थांबण्यास प्रतिबंधित करते. त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. अचानक ब्रेक दाबल्याने वाहन रस्त्यावर घसरण्याची शक्यता अत्यल्प असते.
(एसआयएएम) या उद्योग संस्थेच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतात 1 कोटी 96 लाख 7 हजार 332 दुचाकी वाहने विकली गेली. त्यातील 1 कोटी 53 लाख 10 हजार 587 वाहने 125 सीसी अथवा त्याहून कमी इंजिन क्षमतेची आहेत. देशात विक्री होणार्या एकूण दुचाकींपैकी 125 सीसी अथवा त्याहून कमी क्षमतेच्या वाहनांचा वाटा 78.09 टक्के आहे. म्हणजेच बहुतांश वाहनांना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम नाही. वाहनतज्ज्ञ म्हणाले, कमी किमतीच्या दुचाकींमध्ये एबीएस जोडल्याने त्यांच्या किमती किमान दोन हजार रुपयांनी वाढतील. किमतीत वाढ झाल्यास वाहनांच्या एकूण विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने ही एबीएस प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे.