नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचे शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन झाले. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील हे दुसरे आंदोलन होते. प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा 'कॉजपा'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी यावेळी दिला. सरकारसोबत चर्चा करायला तयार असल्याचे दिपके यांनी सांगितले. सरकारसोबतच्या चर्चेसाठी दिल्ली पोलिसांनी पुढाकार घेत भूमिका बजावावी, असे त्यांनी म्हटले. या आंदोलनात सोनम वांगचूक यांनी देखील आंदोलकांना संबोधित केले.
आंदोलन दुपारी एक वाजता सुरू होणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले होते. मात्र, आंदोलक १ वाजताच्या अगोदरपासूनच आंदोलनस्थळी जमा झाले. ६ जूनच्या आंदोलनापेक्षा यावेळी आंदोलकांची गर्दी जास्त होती. अभिजीत दिपके काही मोजक्या सहकाऱ्यांसह दुपारी दोन वाजताच्या सुमारास आंदोलन स्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणली होती. सुरुवातीलाच त्यांनी सर्व आंदोलकांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्यास दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना परवानगी दिली होती. ही वेळ वाढवून रविवारपर्यंत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आंदोलनस्थळावरून केली. तसेच यासाठी त्यांनी लेखी निवेदन देखील दिले. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांची ही मागणी मान्य केली नाही. आंदोलकांना ५ वाजतानंतर आंदोलनस्थळ रिकामे करण्यास पोलिसांनी सांगितले. यानुसार शेकडो आंदोलकांनी जंतर-मंतर परिसर सोडला. मात्र, दिपके काही सहकाऱ्यांसह आंदोलनस्थळी बसून राहिले.
आंदोलनस्थळी आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू असतानाच, अभिजीत दिपके यांनी सांगितले की, दिल्ली पोलीस आता जंतर-मंतरवर अन्न आणि पाणी नेण्यास मनाई करत आहेत. महात्मा गांधींनीही उपोषण केले होते आणि हे आंदोलकही उपोषण करतील. पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तुमची तुलना जनरल डायरशी केली जाईल. आम्ही दिल्ली पोलिसांना पुन्हा एकदा विनंती करतो की, त्यांनी या परिसरात पाणी आणि अन्न नेण्याची परवानगी द्यावी, असे ते म्हणाले.
टाळी-थाळी वादन आणि 'गो प्रधान गो'च्या घोषणा
आंदोलकांनी टाळ्या-थाळ्या वाजवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते, त्याची आठवण अभिजीत दिपके यांनी यावेळी करुन दिली. आंदोलकांनी 'गो प्रधान गो'च्या घोषणा दिल्या.
आत्महत्या केलेल्या १३ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली
नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या १३ विद्यार्थ्यांना आंदोलकांनी २ मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली. आंदोलकांना संबोधित करण्यासाठी तयार केलेल्या मंचावर या १३ विद्यार्थ्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. अभिजीत दिपके आणि सहकाऱ्यांनी या प्रतिमांना अभिवादन केले.
तिरंगा, विविध फलक आणि राष्ट्रीय घोषणा
आंदोलकांनी तिरंगा झेंडे आणले होते. तसेच विविध फलक देखील आंदोलकांच्या हातात होते. यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधातील नारे लिहिलेले निदर्शनास आले. तसेच वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा राष्ट्रीय घोषणा देखील यावेळी आंदोलकांनी दिल्या.