Seven AAP MPs Merger BJP
नवी दिल्ली : राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी आम आदमी पक्षाच्या (आप) सात खासदारांचे भाजपमधील विलीनीकरण अधिकृतपणे स्वीकारले. यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभेत) अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे संख्याबळ घटून तीनवर आले. तर भाजपचे संख्याबळ वाढून ११३ झाले.
‘आप’ला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सामील झालेल्या खासदारांमध्ये राघव चढ्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजित साहनी, स्वाती मालीवाल आणि राजिंदर गुप्ता यांचा समावेश आहे. राज्यसभा संकेतस्थळावर, हे सात खासदार आता भाजपच्या सदस्य यादीचा भाग बनले आहेत. या सात खासदारांनी शुक्रवारी राज्यसभा सभापतींकडे एक याचिका सादर केली होती. या विलीनीकरणानंतर आपल्याला भाजपचे खासदार म्हणून मान्यता द्यावी, अशी विनंती त्यांनी या याचिकेद्वारे केली होती; आणि ही याचिका स्वीकारण्यात आल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे या खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली होती. मात्र, राज्यसभा सभापतींनी ही मागणी फेटाळल्याचे आता स्पष्ट झाले.
संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी या सात खासदारांचे 'एनडीए'मध्ये स्वागत केले आणि ते म्हणाले की, या खासदारांनी आता "तुकडे-तुकडे 'इंडी' आघाडीला" रामराम ठोकला आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये रिजिजू म्हणाले, 'गेल्या बऱ्याच काळापासून मी हे निरीक्षण नोंदवले आहे की, या ७ खासदारांनी कधीही अपशब्द वापरले नाहीत, तसेच त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा किंवा असंसदीय वर्तन केले नाही.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखालील राष्ट्रनिर्माणास समर्पित अशा 'एनडीए'मध्ये तुमचे स्वागत आहे, असे या मंत्र्यांनी म्हटले.
राज्यसभेतील पक्षीय बलाबल
भाजप- ११३
काँग्रेस- २९
तृणमूल काँग्रेस- १३
द्रमुक- ८
वायएसआर काँग्रेस- ७
बीजेडी- ६
अद्रमुक- ५
जदयू- ४
सपा-४
राष्ट्रवादी काँग्रेस-४
आप-३
राजद-३
बीआरएस-३
शिवसेना शिंदे- २
शिवसेना उबाठा- १
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १