अरविंद केजरीवाल यांच्या कारवर गुंडांनी हल्ला केला, असा दावा आम आदमी पक्षाने एक व्हिडिओ जारी करुन केला आहे.  (Image source- X)
राष्ट्रीय

केजरीवालांच्‍या कारवर हल्ला : 'आप'चा दावा; भाजप म्‍हणाले, "आमच्‍या कार्यकर्त्यांना चिरडले"

दिल्‍ली विधानसभा निवडणूक : आराेप-प्रत्‍याराेप शिगेला

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पाेहचली आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारवर भाजप उमेदवाराच्‍या गुंडांनी हल्ला केला, असा दावा आज (दि. १८) आम आदमी पक्षाने साेशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आल्‍याचा दावा आपने केला आहे. दरम्‍यान, केजरीवाल यांच्‍या कारने आमच्या कार्यकर्त्यांना चिरडले. आमच्या एका कार्यकर्त्यांचा पाय तुटला आहे, असा आराेप भाजपने केला आहे.

भाजप उमेदवाराच्या गुंडांची केजरीवालांच्‍या कारवर दगडफेक : आप

आम आदमी पक्षाने X वर शेअर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, 'भाजप पराभवाला घाबरत आहे. भाजपच्‍या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्‍या कारवर हल्ला केला आहे. 'भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रचार करत असताना विटा आणि दगडांनी हल्ला केला आणि त्यांना प्रचार करू नये म्हणून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीचे लोक तुम्हाला योग्य उत्तर देतील."

केजरीवालांच्‍या कारने दोन कार्यकर्त्यांना चिरडले : भाजप

भाजपने प्रत्युत्तर देत आम आदमी पक्षावर तीव्र हल्ला चढवला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा म्हणाले की, केजरीवाल यांच्या काळ्या कारने आमच्या कार्यकर्त्यांना चिरडले. आमच्या एका कार्यकर्त्यांचा पाय तुटला आहे. मी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी लेडी हार्डिंगकडे जात आहे. गेल्या ११ वर्षांपासून दिल्लीत चालणाऱ्या सरकारने दिल्लीत भ्रष्टाचार पसरवलाच नाही तर दिल्लीलाही उद्ध्वस्त केले आहे. मी देशवासीयांना आणि दिल्लीतील जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे की तुम्हाला दिल्ली वाचवावी लागेल, ११ वर्षांत यमुना केवळ घाण झाली नाही तर ती नाल्यासारखी झाली आहे.

हल्ला झाला नाही : दिल्‍ली पोलीस

केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, लाल बहादूर सदनमध्ये अरविंद केजरीवाल यांची जाहीर सभा होती. भाजपचे काही लोक सभेला आले होते ज्यांना प्रश्न विचारायचे होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना बाजूला केले आहे, असे दिल्‍ली पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT