राष्ट्रीय

‘आप’चा भाजप मुख्यालयावर धडक मोर्चा; कार्यकर्त्यांची धरपकड

अविनाश सुतार

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभवकुमार यांना आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१९) आपच्या कार्यकर्त्यांनी भाजप मुख्यालयावर 'जेल भरो' मोर्चा काढला. यावेळी दिल्ली पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

'आप'ने भाजप मुख्यालयावर धडक मोर्चा का काढला?

  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव बिभवकुमार यांना अटक
  • बिभवकुमार यांच्यावर स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप
  • त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आप कार्यकर्त्यांचा भाजप मुख्यालयावर धडक मोर्चा
  • दिल्ली पोलिसांकडून  आपच्या कार्यकर्त्यांना अटक

डीडीयू मार्गावर कलम 144 लागू

दिल्ली सेंट्रलचे डीसीपी हर्षवर्धन मांडव यांनी सांगितले की, आपच्या भाजप मुख्यालयावरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी डीडीयू मार्गावर प्रतिबंधात्मक व्यवस्था केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न केल्यास कडक शिक्षा केली जाणार आहे. परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली असून बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. डीडीयू मार्गावर कलम 144 लागू करण्यात आले आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला परवानगी नाही, असे त्यांनी सांगितले.

डीडीयू मार्ग सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वाहनांसाठी बंद

दिल्ली वाहतूक पोलिसांनी डीडीयू मार्ग, आयपी मार्ग, मिंटो रोड आणि विकास मार्गावर संभाव्य वाहतूक कोंडीचा इशारा दिला आहे. डीडीयू मार्ग सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वाहनांसाठी बंद ठेवला जाऊ शकतो, असे ॲडव्हायझरीमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रवाशांना ट्रॅफिक जाम होऊ शकतील, अशा मार्गांपासून दूर जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

भाजपला अरविंद केजरीवाल यांच्या कामाची भीती

दिल्लीचे मंत्री आणि आप नेत्या आतिशी म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आम आदमी पक्षाच्या सर्व नेत्यांना एक एक करून तुरुंगात टाकत आहेत.  कारण त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या कामाची भीती वाटत आहे. ते 24- तास वीज, मोफत वीज, चांगल्या शाळा, या कामामुळेच त्यांना आम आदमी पार्टी संपवायची आहे.

दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. बिभवकुमार यांना अटक करून भाजप 'जेल का खेल' मध्ये गुंतले आहे, असा आरोप केला होता. या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह आणि कार्यकर्त्यांसह 'जेल भरो' मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.

तत्पूर्वी, मालिवाल यांच्यावरील कथित हल्ल्याप्रकरणी केजरीवाल यांच्या माजी स्वीय सहाय्यकाला शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. तीस हजारी न्यायालयात त्यांना हजर केल्यानंतर पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT