आधारशी पॅन लिंकिंगची मुदत 31 डिसेंबरपर्यंत pudhari photo
राष्ट्रीय

Aadhaar PAN linking deadline : आधारशी पॅन लिंकिंगची मुदत 31 डिसेंबरपर्यंत

...अन्यथा पॅन होणार निष्क्रिय; पगारही बँक खात्यात जमा होणे कठीण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत नव्याने वाढवली असून, आधार कार्ड पॅनशी न जोडल्यास तुमचे पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे.

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास तुम्हाला ना प्राप्तिकर भरता येईल, ना रिफंड मिळेल. एवढेच नव्हे, तर पगार बँक खात्यात जमा होणेदेखील जवळपास अशक्य होणार आहे. कर क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लवकरात लवकर पॅन आणि आधार लिंक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि करांशी संबंधित कामे सुरळीत सुरू राहतील.

कोणासाठी ही प्रक्रिया अनिवार्य?

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 3 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1 ऑक्टोबर 2024 च्या आधी ज्यांना आधार अर्जासाठी एनरोलमेंट आयडीच्या आधारे पॅन कार्ड जारी करण्यात आले आहे, त्यांना आपला आधार नंबर 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्तिकर विभागाला कळवावा लागेल. याचा अर्थ जर तुम्ही आधार एनरोलमेंट आयडीच्या माध्यमातून पॅन तयार केले असेल, तर आधार नंबर मिळाल्यानंतर पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर ही प्रक्रिया ऑनलाईन पार पाडता येते.

पॅन निष्क्रिय झाल्यास काय होईल?

  • बँक खाते किंवा डिमॅट खाते उघडता येणार नाही

  • 50 हजारांपेक्षा जास्त रोख ठेव ठेवता येणार नाही

  • गुंतवणूक, एसआयपी सुरू करणे, ट्रेडिंग करणे अशक्य

  • सरकारी आर्थिक कल्याण योजनांचा लाभ मिळणार नाही

  • कर्जाचा अर्ज स्वीकारला जाणार नाही

  • घर, वाहन खरेदी-विक्री करता येणार नाही

  • बिलिंग किंवा कर भरण्याचे सर्व कामकाज थांबेल

  • परकीय चलन व्यवहार करता येणार नाहीत

लिंक करण्याची सोपी पद्धत

आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याकरिता इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या. ‌‘लिंक आधार‌’ टॅबवर क्लिक करा. तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाकून व्हॅलिडेट बटण दाबा. मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल आणि पॅन-आधार लिंक होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT