aadhaar document update file photo
राष्ट्रीय

Aadhaar Update : ... तर १० वर्ष जुने आधार कार्ड रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय

ज्या व्यक्तींचे आधार कार्ड १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुने आहे, त्यांनी एकदाही ते अपडेट केलेले नाही, त्यांनी सरकारचा हा निर्णय पाहा.

मोहन कारंडे

Aadhaar Update :

नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२५ रोजी संपणार होती, ती आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. UIDAI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' द्वारे ही माहिती दिली.

..तर आधार कार्ड रद्द होणार

या निर्णयामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळाला आहे. विशेषतः ज्या व्यक्तींचे आधार कार्ड १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुने आहे, त्यांनी एकदाही ते अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी हे अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की अशा व्यक्तींनी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करून आपले आधार तपशील अद्ययावत करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास त्यांचे आधार कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांना दोन प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल - एक ओळखीचा पुरावा (उदा. पॅन कार्ड) आणि दुसरा पत्त्याचा पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र). साधारणपणे आधार केंद्रांवर या प्रक्रियेसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. तथापि, UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ पर्यंत ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल.

घरबसल्या करू शकता अपडेट

 नागरिक घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला (website) भेट देऊन आधार अपडेट करू शकतात.

  1. संकेतस्थळावर 'अपडेट आधार' या पर्यायावर क्लिक करा.

  2. आपला आधार क्रमांक टाकून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी (OTP) वापरून लॉग इन करा.

  3. 'डॉक्युमेंट अपडेट' या पर्यायावर क्लिक करून आपले तपशील तपासा.

  4. त्यानंतर, ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

  5. सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करून 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

  6. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर एक विनंती क्रमांक (Request Number) मिळेल. या क्रमांकाद्वारे नागरिक आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकतील. काही दिवसांतच आधार कार्डमधील माहिती अद्ययावत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT