बंगळूर : वृत्तसंस्था
माझी माजी पत्नी महालक्ष्मी (वय 29) हिला अशरफने भुलवले. तो बोलघेवडा होता. अशरफ आणि ती एकत्र राहात होते. अशरफनेच तिचे 30 तुकडे करून नंतर विल्हेवाट लावण्याच्या हिशेबाने फ्रीजमध्ये ठेवले, असे हेमंत दास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.दास यांनी पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे. अशरफसाठी महालक्ष्मी हिने पती हेमंत दास यांना सोडलेले होते. याउपर महालक्ष्मीची हत्या झाल्याचे कळताच हेमंत दास तिच्या मृतदेहाचे तुकडे आढळलेल्या घरी आले. पोलिसांनाही सामोरे गेले. पण अशरफ अद्याप बेपत्ता आहे.
मृत महालक्ष्मीच्या पहिल्या पतीची तक्रार
पोलिस उत्तराखंड, बंगालला रवाना
माहेरकडूनही तुटली होती मृत महिला
महालक्ष्मी गेल्या 9 महिन्यांपासून पती हेमंत दास यांच्यापासून वेगळी राहात होती. हेमंतपासून महालक्ष्मीला एक मुलगीही आहे. ती हेमंतसोबतच राहते. हेमंतच्या दुकानावर महिनाभरापूर्वी मुलीला भेटायला म्हणून महालक्ष्मी आलेली होती. तेव्हा माझे महालक्ष्मीशी शेवटचे व जुजबी बोलणे झाले होते, असेही हेमंत यांनी सांगितले. महालक्ष्मी काही महिन्यांपासून अशरफसोबतसोबत पाईपलाईन रोडवरील व्यालिकमल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मल्लेश्वरम भागातील एका फ्लॅटमध्ये राहात होती. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने रविवारी शेजार्यांनी महालक्ष्मीच्या आईला हे कळवले. आई आणि बहिणीने घरमालक जयराम यांना बोलावून दरवाजा उघडला तेव्हा हा भयावह प्रकार समोर आला. पोलिसांना फ्रीजलगत एक बॅगही ठेवलेली आढळली. महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे या बॅगमध्ये भरून विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा डाव असावा. पण असे काही घडले की, त्याला तो तत्क्षणी रद्द करण्याचा प्रसंग ओढवला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
महालक्ष्मीच्या फोन शेवटचा 2 सप्टेंबरला सुरू होता. याच दिवशी तिची हत्या झाली असावी, असाही पोलिसांचा अंदाज आहे. घरातील कुठलीही वस्तू चोरीला गेलेली नसल्याने खून परिचितांपैकीच कुणीतरी केलेला आहे, हे पोलिसांनी पहिल्याच दिवशी हेरलेले होते.
महालक्ष्मीची आई आणि बहीण शेजार्यांकडून दुर्गंधीची बाब कळल्यावर आले खरे; पण या दोघींसह लगतच राहणारा चुलत भाऊही महालक्ष्मीच्या संपर्कात नव्हता. अशरफशी संबंधांमुळे सगळेच तिच्यावर नाराज होते. अशरफने आधी तिला सर्वांकडून तोडले आणि नंतर स्वत: तिचे तुकडे केले, असे हेमंत दास यांचे म्हणणे आहे.
अशरफ हा मूळचा उत्तराखंड राज्यातील रहिवासी असून बंगळूरमध्ये तो एका सलूनमध्ये काम करत होता.
हेमंत दास याने महालक्ष्मीच्या संदर्भात अशरफविरुद्ध नेलमंगला पोलिस ठाण्यात वर्षभरापूर्वी तक्रारही दाखल केली होती.
महालक्ष्मीसोबत अशरफ राहात होता, पण दोघांचे संबंध सहा महिनेच चांगले राहिले, असे हेमंतचे म्हणणे आहे.
महालक्ष्मी हिच्यासोबत मॉलमध्ये काम करणारे तिचे सहकारी मुक्ता, शशिधर आणि सुनील यांची नावेही संशयितांच्या यादीत आहेत. कामाच्या ठिकाणी या तिघांचा महालक्ष्मीसोबत वाद झाला होता, हे त्यामागचे कारण. तपासाचा फोकस मात्र अशरफवरच आहे. अशरफ बेपत्ता असल्याने हा फोकस अधिकच गडद झालेला आहे.
18 मे 2022 रोजी दिल्लीत लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिचे आफताब अमीन याने 35 तुकडे केले होते.
श्रद्धाच्या शरीराचे तुकडे आफताबने 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते. या तुकड्यांची त्याने टप्प्याटप्प्याने विल्हेवाट लावली होती.