राष्ट्रीय

मातृदिन विशेष : शब्दांपलीकडचं नातं

Pudhari News

संदीप खरे, कवी, गीतकार

'आई'शी असणारं नातं हे शब्दात न सामावणारं आहे. हा विषय शब्दातीत आहे. मी कवी आहे, मी नेहमीच शब्दांशी खेळतो म्हणूनच मी हे ठामपणे सांगतो की, शब्दांच्याही पलीकडे अव्यक्त असं जे काही उभं आहे ते म्हणजे 'आई'. तिच्याबद्दलच्या भावना शब्दांतून व्यक्त न करता येणं ही माझ्यातल्या कवीची हार आहे आणि हेच या नात्याचं वैशिष्ट्य आहे, असं मला वाटतं.

कुठलाही 'डे' साजरा करणं किंवा न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे ते चूक की बरोबर हे आपण ठरवणं योग्य नाही. 'मदर्स डे'च्या बाबतीतही मी असंच म्हणेन. आईच नातं हे आयुष्यभराच्या ऋणानुबंधानं जोडलेलं असतं. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीतरी खास करावं, ती आनंदी राहील यासाठी प्रयत्न करणं, यामध्ये काही चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. मार्ग कुठलाही असला तरी शेवटी भावना व्यक्त करणं महत्त्वाचं असतं आणि त्या तुम्ही कशाही प्रकारे व्यक्त करता हे महत्त्वाचं. आपण जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो. कारण, त्या व्यक्तीबद्दलच्या भावना, आनंद आपल्याला व्यक्त करायचा असतो. त्यामध्ये चुकीचं काही नाही. तसेच मातृदिनाबाबतही म्हणता येईल. मातृदिन साजरा करण्यामुळे आईच्या पदरी आनंद पडत असेल, तर तो साजरा करायला काहीच हरकत नाही. 

'आई' या शब्दाची व्याप्ती अतिशय विस्तृत आहेे. आईच्या ऋणांची परतफेड करणं तर दूरच; पण त्याची बरोबरीही आपण करू शकत नाही. आई हे परमेश्वराचंच रूप आहे, त्यामुळे ते ईश्वराइतकचं निर्मळही आहे. आईबद्दलचं प्रेम, आदर, कृतज्ञता हे एका दिवसात किंवा एखादी छोटीशी भेटवस्तू देऊन व्यक्त होण्यासारखं नाही. मुलांनी आपल्याला एखादी साडी घ्यावी, दागिना घ्यावा, असं आईला काहीही अपेक्षित नसतं. त्यापेक्षा मुलांनी नेहमी चांगलं वागावं, आपल्याला अभिमान वाटेल असं राहावं, इतकीच त्या माऊलीची अपेक्षा असते. अर्थातच, आपण छोट्याशा कृतीतूनही आईबद्दलच्या भावना व्यक्त करू शकतो. माझ्या आईला फिरायला खूप आवडतं. त्यामुळे मी एखादी सहल तिच्यासाठी आयोजित केली तरी तिला खूप आनंद होतो. अर्थात, अशा कुठल्याही प्रकारची अपेक्षा ती माझ्याकडून ठेवत नाही; परंतु या गोष्टी स्वत:हूनच जाणून घ्यायच्या असतात, असं मला वाटतं. 

'आई' किंवा मातृत्व हे शब्दात न सामावणारं नातं आहे. हा विषय शब्दातीत आहे. मी कवी आहे, मी नेहमीच शब्दांशी खेळतो म्हणूनच मी हे ठामपणे सांगतो की शब्दांच्याही पलीकडे अव्यक्त असं जे काही उभं आहे ते म्हणजे आई. आईबद्दलच्या भावना शब्दातून व्यक्त न करता येणं ही माझ्यातल्या कवीची हार आहे आणि हेच या नात्याचं वैशिष्ट्य आहे, असं मला वाटतं. माझं आणि माझ्या आईचंही नातं असंच शब्दांच्या पलीकडचं आहे. माझ्याबद्दलचं प्रेम, माझ्या कौतुकामुळे होणारा आनंद तिच्या डोळ्यांमधून मला दिसतो त्यासाठी शब्दांची गरज नसते. एखाद्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दहा मिनिटे आधी ती खूप टेन्शनमध्ये असते. कार्यक्रम कसा होईल याबद्दल तिच्या मनात काहीसं दडपण असतं. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर लोकांच्या कौतुकाचा वर्षाव पाहताना तिच्या डोळ्यांमधून आनंदाच्या, अभिमानाच्या भावना व्यक्त होऊ लागतात. कार्यक्रम खूप छान झाला, असं म्हणण्याऐवजी ती फक्त पाठीवर कौतुकाची थाप देते आणि तो स्पर्श मला सगळं काही सांगून जातो. तिच्या मनातल्या भावनांना येथे शब्दांची गरज नसते. ते कळण्यासाठी आई आणि मुलाचं नातचं पुरेसं असतं. 

आई आणि मुलाचं हे नातं वयाशी आणि काळाशी निगडित नाही. ते कालातीत आहे. आदिम काळापासून हे नातं तेवढचं जिव्हाळ्याचं आणि पवित्र आहे आणि भविष्यातही हे नातं तितकचं निर्मळ राहणारं आहे. त्यामुळे काळ बदलला तरी या नात्यातील अतूट बंध तसेच राहणार आहेत. काही वेळा वेगवेगळ्या परिस्थितीमुळे काही व्यवहारी निर्णय घ्यावे लागतात, आईपासून दूर राहावे लागते; पण म्हणून या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा कमी होत नाही. आपल्या मुलांनी आपल्या जवळच राहावे, अशी आईची कधीच अपेक्षा नसते. त्याने आनंदी, समाधानी आणि यशस्वी बनावं हीच तिची अपेक्षा असते. मुलाच्या मनात आपल्याबद्दल असणारी आस्था, कळकळ, आईला नेमकी समजत असते. त्यामुळे मुलाच्या मनात आईबद्दल असणार्‍या भावना कशा आहेत, हे खूप महत्त्वाचे आहे. त्या कृतीतून व्यक्त करता आल्या नाहीत  तरीही आईला समजत असतात. आईला आनंदी ठेवण्यासाठी फारसं काही करण्याची गरज नसते. 'हा माझा मुलगा किंवा मुलगी आहे, असे म्हणताना आईला अभिमान वाटावा, असे कृत्य केले तरी आईसाठी ते खूप असते.

    (शब्दांकन : स्वाती देसाई)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT