पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील अल्मोडा येथे बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 23 जण ठार झाले आहेत, तर 20 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये सुमारे 45 प्रवासी होते. घटनास्थळी एसडीआरएफ आणि पोलिसांचे बचाव कार्य सुरु आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. तसेच पोलीस मुख्यालयाचे प्रवक्ते आयजी नीलेश आनंद भरणे यांनी 'एएनआय'ला सांगितले की, अल्मोडा बस अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात झालेल्या बसमध्ये 45 हून अधिक लोक प्रवास करत होते, असेही ते म्हणाले.
गौरीखाल येथून आज (दि. 5)सकाळी एक बस रामनगरसाठी निघाली होती. बसमध्ये 45 प्रवासी होते. सॉल्ट्स कूपजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. सकाळी नऊच्या सुमारास जखमी प्रवाशांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी सांगितले की, मीठ आणि रानीखेत येथून पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. आतापर्यंत 23 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिले आहे. या बरोबरच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांना दिले आहे. हे आदेश कुमाऊं विभागाच्या आयुक्तांना दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झालेल्या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.