पुढारी ऑनलाईन डेस्क: एका ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील ओडिशातून पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. या कासवाला ओडिशातील किनाऱ्यावर टॅग लावण्यात आला होता.
त्यामुळे या कासवाची ओळख पटली आहे. ओडिशाच्या गहीरमाथा किनाऱ्यावरून थेट महाराष्ट्रातील गुहागर समुद्रकिनाऱ्यापर्यंत असा एकूण सुमारे 3500 किलोमीटरचा समुद्री प्रवास या कासवाने केला आहे.
कासवाच्या या दीर्घ समुद्री प्रवासामुळे वैज्ञानिकही बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे ऑलिव्ह रिडले कासवांबाबतच्या संशोधनालाही चालना मिळणार आहे.
संशोधकांना आतापर्यंत वाटत होते की पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील कासवांची प्रजननस्थळे वेगळी आहेत. पण ‘03233’ या टॅग क्रमांकाच्या कासवाने ही समज खोटी ठरवली आहे.
या कासवाला 18 मार्च 2021 रोजी ओडिशातील गहीरमाथा किनाऱ्यावर झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. बसुदेव त्रिपाठी यांनी फ्लिपर टॅग केले होते. डॉ. त्रिपाठी यांनी तीन वर्षात 12000 कासवांना टॅगिंग केले होते.
यावर्षी 27 जानेवारी रोजी तीच मादी गुहागर किनाऱ्यावर अंडी घालताना आढळली. महाराष्ट्रातील मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशनच्या चमूने रात्रीच्या फ्लिपर टॅगिंग मोहिमेदरम्यान ही घटना नोंदवली.
संशोधकांच्या मते, हे कासव सुमारे 3500 किलोमीटरचा प्रवास करून ओडिशा ते श्रीलंका मार्गे महाराष्ट्रात पोहोचली असावी. डिसेंबर ते मार्चदरम्यान ऑलिव्ह रिडले कासवे अनेक किनाऱ्यांवर अंडी घालतात. डॉ. त्रिपाठी यांनी ओडिशामध्ये गेल्या तीन वर्षांत 12000 कासवांना टॅग केले होते.
एकाच हंगामात सामूहिक व एकल प्रजननाची दुहेरी रणनीती या मादी कासवाने वापरल्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. पूर्वी श्रीलंकेपर्यंत प्रवास करणाऱ्या कासवांचे पुरावे होते, पण दोन्ही किनाऱ्यांवर एकाच कासवाने अंडी घातल्याची ही पहिलीच नोंद असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रत्नागिरीतील गुहागर या कासवाने पुन्हा समुद्रात प्रवेश केला. आता ही मादी कासव पुन्हा कधी येणार याची पुन्हा वैज्ञानिकांना उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार “31 जानेवारी रोजी गुहागर येथे ‘03233’ हे कासव प्रथम आढळले. त्यानंतर या कासवाचा टॅग नंबर तपासला गेला. त्यानंतर त्याची ओळख पटली.”
मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशनच्या 'कासव मित्र' स्वयंसेवकांनी कासवाच्या सुरक्षेची खबरदारी घेत तिच्या 107 पिल्लांना 23 ते 26 मार्च दरम्यान समुद्रात सोडले.
दरम्यान, ऑलिव्ह रिडले कासवांच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग, मॅन्ग्रोव्ह सेल आणि वन्यजीव संस्था एकत्र येऊन फ्लिपर टॅगिंग प्रकल्प राबवत आहेत.
आतापर्यंत 64 कासवांना टॅग करण्यात आले असून, पुढील काही वर्षांत या कासवांच्या स्थलांतराच्या प्रवृत्ती, प्रजनन पद्धती आणि हवामान बदलाचा परिणाम यावर अधिक सखोल माहिती मिळण्याची शक्यता आहे.
मासेमारीमुळे या कासवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीमुखाजवळ आणि त्यांच्या मुख्य प्रजनन ठिकाणी मासेमारीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी संशोधकांनी केली आहे.