राष्ट्रीय

Rajiv Gandhi : राजीव गांधींना स्मृतीदिनी भावपूर्ण आदरांजली; राहुल गांधींची भावूक पोस्ट

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Rajiv Gandhi |  दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त राजधानी दिल्लीतील 'वीरभूमी' या समाधीस्थळी अनेक मान्यवरांनी भेट देऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम राबवून राजीव गांधी यांना श्रध्दांजली वाहिली.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी राजीव गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक्सवर पोस्ट करुन राजीव गांधी यांना श्रध्दांजली अर्पण केली. याशिवाय देशभरातील अनेक नेत्यांनी राजीव गांधी यांच्या बलिदानाची आठवण काढून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.

अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करून राजीव गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.

राहुल गांधींची भावूक पोस्ट

राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांविषयी सोशल मीडियावरील एक्सवर अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. "बाबा, तुमचे स्वप्न हेच माझे स्वप्न आहे. तुमच्या आकांक्षा माझ्या जबाबदाऱ्या आहेत. तुमच्या आठवणी नेहमीच आमच्या हृदयात ताज्या आहेत आणि असतील," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच राहुल गांधी यांनी वडिलांसोबतचा त्यांच्या बालपणीचा एक फोटो देखील या पोस्टमध्ये जोडला आहे.

SCROLL FOR NEXT