बंगळूरमधील एका कॉफी शॉपमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून मोबाइल फोन लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे. file photo
राष्ट्रीय

महिलांच्या वॉशरुममध्ये सापडला छुपा फोन, व्हिडिओ होता ऑन

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

बंगळूरमध्ये (Bengaluru Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कॉफी शॉपमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहात (वॉशरुम) डस्टबिनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करत मोबाइल फोन लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एका २३ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका महिलेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवला होता; ज्यामुळे त्याचा आवाज येत नव्हता.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, संशयित आरोपी मनोज हा बंगळूरच्या गुट्टाहल्लीत राहात असून तो मूळचा शिवमोग्गा येथील आहे. तो बीईएल रोड येथील एका कॉफी शॉपमध्ये सहा महिन्यांपासून काम करत होता. या घटनेनंतर त्याला कामावरून काढून टाकल्याचे संबंधित कॉफी चेनकडून सांगण्यात आले आहे.

Bengaluru Crime : काय म्हटले आहे इन्स्टा स्टोरीमध्ये?

इन्स्टाग्रामवर एका महिलेबद्दल एक स्टोरी पोस्ट करण्यात आली होती; जिला महिलांच्या शौचालयाच्या डस्टबिनमध्ये लपलेला एक फोन सापडला होता. सदर फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु होते. त्यानंतर सदर कॉफी शॉपमधील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली.

"मी ९ ऑगस्ट रोजी सकाळी बंगळूरमधील एका आउटलेटवर होते, तेव्हा तिथे एका महिलेला स्वच्छतागृहात एक फोन सापडला. हा फोन डस्टबिनमध्ये लपवून ठेवला होता. त्यात सुमारे दोन तास व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु होते. तसेच टॉयलेट सीटकडे तोंड करुन हा फोन ठेवला होता," असे इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे.

फोन ठेवला होता फ्लाइट मोडमध्ये

फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवला होता, जेणेकरून त्याचा आवाज येणार नाही", असेही त्यात म्हटले आहे. पोस्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की फोन डस्टबिन बॅगच्या आत ठेवला होता; ज्यामध्ये एक छिद्र होते. जेणेकरून कॅमेऱ्याला दृश्य दिसेल. "सदर फोन तेथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा असल्याचे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. ते तिथे लवकरच पोहोचले आणि कारवाई करण्यात आली," असे स्टोरीमध्ये म्हटले आहे.

महिलांनी दक्षता बाळगावी

"हे पाहणे खूप भयंकर होते. कॅफे अथवा रेस्टॉरंटची साखळी कितीही प्रसिद्ध असली तरीही मी इथून पुढे कोणत्याही स्वच्छतागृहात दक्षता बाळगीन. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, तुम्हीही दक्ष राहावे. कारण हा प्रकार खूप घृणास्पद आहे," असे एका महिलेने इन्स्टा स्टोरीमध्ये नमूद केले आहे.

इन्स्टाग्रामवरील स्टोरी पोस्ट.

दरम्यान, संबंधित कॉफी चेनने जारी केलेल्या एका निवेदनात, या घृणास्पद घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि व्यवस्थापनाने सदर कर्मचाऱ्याला काढून टाकल्याचे म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT