पुढारी ऑनलाईन डेस्क
संसद सुरक्षेचा भंग (Parliament Security Breach) झाल्याची पुन्हा एक घटना काल शुक्रवारी (दि. १६) दुपारी घडली. एका तरुणाने भिंतीवरून उडी मारून संसद संकुलात प्रवेश केला. पण तेथे तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्याला पकडून दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) ताब्यात दिले. या घटनेता एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे; ज्यात संशयित शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातलेला असून सशस्त्र CISF जवानाने त्याला पकडलेले दिसते.
त्याच्या चौकशीदरम्यान त्या व्यक्तीकडे काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती सीआयएसएफच्या सूत्रांनी दिली. ही घटना दुपारी २.४५ च्या सुमारास इम्तियाज खान मार्गाच्या बाजूला घडली. सदर तरुण २० वर्ष वयाचा असून तो उत्तर प्रदेशातील अलिगढचा रहिवासी आहे. मनीष असे त्याचे नाव आहे. त्याने भिंतीवरून उडी मारुन संसद संकुलाच्या इमारतीत प्रवेश केला, असे सूत्रांनी सांगितले.
संसद संकुलाच्या सुरक्षेची देखरेख करणाऱ्या सीआयएसएफ जवानांनी त्या व्यक्तीला संसद आवारात पाहिल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली होती.
इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, या विषयी माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या व्यक्तीला जवळच्या पोलिस ठाण्यात नेले. तिथे त्याची चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "तो भिंत ओलांडून संसद आवारात कसा आला? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे."
अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की, सदर व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे दिसते. कारण तो त्याचे नाव नीटपणे सांगू शकत नाही. केंद्रीय सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांनीदेखील त्यांची चौकशी केली होती. पण त्याच्याकडे काहीही संशयास्पद आढळून आले नाही, असे अधिकृत सूत्राने सांगितले.
गेल्या वर्षी १३ डिसेंबरला दोन लोक संसदेत घुसले होते. त्यांनी सदनात रंगीत धूर सोडला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेचा आढावा घेत संसदेत सीआयएसएफ सुरक्षा तैनात करण्यास मंजुरी देण्यात आली होती. संसदेतील घुसखोरीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. या घटनेनंतर दिल्ली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (CRPF) संसदेच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. पण बाहेरून सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी पोलिसांकडे आहे. सध्या संसद संकुलाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे. ज्यात जुन्या आणि नवीन संसदेच्या इमारती आणि त्यांच्याशी संलग्न इमारती आहेत.