नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या विधानावरुन मंगळवारी, राज्यसभेत गदारोळ झाला. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, असे म्हटले. त्यावर खर्गे यांनी राज्यसभा उपसभापती हरिवंश यांची माफी मागितली. मात्र, सरकारची माफी मागण्यास नकार दिला. तर मंत्र्यांचा राजीनामा उपसभापतींनी घ्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी केली.
राज्यसभेत काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांना शिक्षण मंत्रालयासंबंधी बोलण्यासाठी उपसभापती हरिवंश यांनी वेळ दिला. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ करायला सुरुवात केली. दरम्यान, खर्गे त्यांच्या आसनावर उभे राहिले. यावर उपसभापती हरिवंश यांनी त्यांना अडवले. यावर खर्गे म्हणाले की, ही कोणत्या प्रकारची हुकूमशाही आहे? मी तुम्हाला हात जोडून बोलण्याची परवानगी मागत आहे.
यानंतर हरिवंश म्हणाले की, तुम्ही सकाळीच बोलला आहात. आता बोलण्याची वेळी दिग्विजय सिंह यांची आहे, म्हणून कृपया खाली बसा. यानंतर, खर्गे म्हणाले, मी नक्कीच बोलेन, पण तुम्हाला जे काही ठोकायचे आहे ते आम्ही व्यवस्थित ठोकू, आम्ही सरकारलाही ठोकणार. हरिवंश यांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. तेव्हा खर्गे म्हणाले की, आम्ही सरकारच्या धोरणांवर प्रहार करण्याबद्दल बोलत आहोत.
खरगे यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याकडून सभापतींच्या खुर्चीबद्दल अशी भाषा कोणत्याही स्वरूपात स्वीकार्य नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी उपसभापती हरिवंश यांच्याकडे मागणी केली की, असे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावेत. अशी भाषा अत्यंत निंदनीय आहे आणि ती क्षमेला पात्र नाही. तरीही त्यांनी माफी मागावी.
यानंतर, खरगे सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले की, मी उपसभापतींसाठी असे शब्द वापरले नाहीत. त्यांनी उपसभापतींना सांगितले की, जर तुम्हाला माझ्या बोलण्याने दुखावले असेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो. मी सरकारच्या धोरणांसाठी ठोको हा शब्द वापरला आहे. मी सरकारची माफी मागणार नाही.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या टिप्पणीबद्दल पुढे बोलताना खरगे म्हणाले की, जर तुम्ही (धर्मेंद्र प्रधान) देशातील एका वर्गाच्या भावना दुखावण्यासाठी बोलणार असाल. जर तुम्ही असे म्हणत असाल की, ते असंस्कृत, असभ्य आहेत तर तुम्ही राजीनामा द्यावा. तुम्ही देशाचे विभाजन करण्याबद्दल बोलत आहात, असे खर्गे म्हणाले. दरम्यान, सोमवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत बोलताना तामिळनाडू सरकार आणि द्रमुकच्या खासदारांवर खोटे आणि बेईमान असल्याचा आरोप केला होता. केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे कामकाज तहकूब झाले होते, त्यावर द्रमुकने निषेध व्यक्त केला होता.