राष्ट्रीय

चीनचे ९० टक्के सैनिक लडाख सीमेवरून माघारी

Pudhari News

लेह (लडाख) : वृत्तसंस्था

पूर्व लडाखमध्ये चीनने केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारताने हाणून पाडल्यानंतर सीमावादाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मीने (चीनची लाल सेना) या भागात 50 हजारांवर सैनिक तैनात केले होते. लडाख परिसरातील थंडी न मानवल्याने शेकडो चिनी सैनिक आजारी पडू लागले. अखेर पीपल्स लिबरेशन आर्मीने या भागातून 90 टक्के सैनिकांना माघारी बोलावले आहे.

अधिक वाचा : होम आयसोलेशन आणि विमा कवच

गेल्या वर्षी एप्रिल ते मे या कालावधीनंतर चीनने लडाखच्या पूर्वेकडील भारतीय हद्दीजवळ जवळपास 50 हजार सैनिक तैनात केले होते. यापैकी 90 टक्के सैनिक आता या भागातून परतले आहेत. पँगाँग सरोवराच्या भागातील चिनी चौक्यांतूनही याआधी चिनी लष्कराकडून दररोज चौक्यांवरील सैनिकांच्या नियुक्त्या रोटेशनने बदलण्यात येत होत्याच.

पूर्व लडाखमधील उंच भागांमधील थंडी जीवघेणी असतेे. ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झालेले असते. त्यामुळे सैनिक थोड्या थोड्या वेळाने खालच्या बाजूला येतात. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय सैन्यही अशा उंच भागांतून तैनात आहे. दर वर्षी सुमारे 40-50 टक्के सैनिक खाली बोलावले जातात. गलवान खोर्‍यात चिनी सैनिक आणि भारतीय जवानांत झालेल्या हिंसक धुमश्चक्रीनंतर या भागात सातत्याने तणावाची स्थिती आहे. एप्रिल-मेपासून भारत आणि चीनकडून पूर्व लडाख आणि वास्तविक नियंत्रण रेषेच्या इतर भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात होते. चालू वर्षाच्या सुरुवातीलाच दोन्ही देशांत झालेल्या कमांडरस्तरीय चर्चेअंती पँगाँग सरोवर क्षेत्रातून दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याचे व या भागातील गस्त थांबविण्याचे मान्य केले. याउपरही चीनने अनेकदा दगाबाजी करून या भागातील गस्त सुरूच ठेवली. त्यामुळे नाईलाजाने भारतालाही या भागात गस्त सुरू ठेवावी लागलेली आहे.

अधिक वाचा : अंतराळात कधी होणार पहिल्या मुलाचा जन्म ?

'या' भारतीय जवानांची दोन वर्षे 

भारतीय लष्करातील 'आयटीबीपी'च्या (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस) जवानांना बर्‍याचदा या भागांतून दोन वर्षांपेक्षा जास्त काळ थांबावे लागते. या जवानांमध्ये कितीही कडाक्याच्या थंडीचा सामना करण्याची उपजत क्षमता तरी आहे, किंवा त्यांनी ती अर्जित तरी केलेली आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT