file photo  
राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये 9 नक्षलवादी ठार

दिनेश चोरगे

विजापूर; वृत्तसंस्था : सुरक्षा दलांच्या तुकड्यांनी छत्तीसगडच्या जंगलात हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांच्या टोळीसोबत झालेल्या जोरदार चकमकीत नऊ नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही सुरक्षा दलांनी हस्तगत केली.

पोलिस अधीक्षक जितेंद्रकुमार यादव यांनी सांगितले, नऊ नक्षलवादी मरण पावले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक सोमवारी बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर भागात गस्त घात असताना ही चकमक झडली. कोरचोली आणि लेंड्रा जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल (डीआरजी) केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआतपीएफ), कोबरा, बस्तर फायटर्स, बस्तरिया बटालियन आणि केंद्रीय आर्म्ड पोलिस दलाच्या (सीएएफ) जवानांनी सोमवारी संयुक्त मोहीम राबविली. सकाळी सहाच्या सुमारास लेंड्रा जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. सुमारे सात तास चाललेल्या या चकमकी नक्षलींनी अत्याधुनिक शस्त्रांच्या मदतीने गोळीबार केला. अखेर या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात सुरक्षा दलांना यश आहे. चकमकीच्या ठिकाणांवर सुरक्षा दलांना अत्याधुनिक एके-47 आणि लाईट मशिन गनसारखी हत्यारे सापडली. सर्व 9 मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून या चकमकीत जखमी झालेल्या जवानांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

12 ते 15 नक्षल्यांची ही टोळी असावी असा कयास असून चकमकीत आणखी काही नक्षली जखमी झाले असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असे पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले. लपलेल्या नक्षलींच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून त्यात जंगलाचा कानाकोपरा पिंजून काढला जात आहे.

निवडणुकीत घातपाताचा कट

बिजापूर हा छत्तीसगडच्या बस्तर भागात येतो. येथील लोकसभेच्या जागांवर येत्या 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत घातपात घडवण्याचे नक्षलवाद्यांचे षड्यंत्र असून त्यामुळेच सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे, असे बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले.

बालाघाटमधील नक्षलवाद्यांवर होते इनाम

एकीकडे छत्तीसगडमध्ये चकमक होत असताना मध्य प्रदेश व छत्तीसगड सीमेवरील डाबरी आणि पिटकोनाजवळील केराझरीच्या जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मरण पावलेल्यांत डीव्हीसीएम सजंती ऊर्फ क्रांती या महिला नक्षलवाद्याचा आणि रघू ऊर्फ शेरसिंह एसीएम या नक्षलवाद्याचा समावेश आहे. सजंतीच्या डोक्यावर 29 लाख रुपयांचे, तर रघूच्या डोक्यावर 14 लाख रुपयांचे इनाम होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT