Vaishno Devi Parikrama Route | वैष्णोदेवी परिक्रमा मार्गासाठी ८० कोटी  
राष्ट्रीय

Vaishno Devi Parikrama Route | वैष्णोदेवी परिक्रमा मार्गासाठी ८० कोटी

मथुरेतील गोवर्धन परिक्रमेच्या धर्तीवर ३८ कि.मी.चा गोलाकार रस्ता

पुढारी वृत्तसेवा

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात ८० कोटी रुपयांचा परिक्रमा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. मथुरा-वृंदावन येथील गोवर्धन परिक्रमेच्या धर्तीवर हा गोलाकार मार्ग विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना परिक्रमेची सुविधा मिळण्याबरोबरच रियासी आणि उधमपूर जिल्ह्यांतील दुर्गम भागांचा विकास होण्यास मदत होणार आहे.

दुर्गम गावांना मिळणार उत्तम रस्ते

केंद्र सरकारने या विशेष प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. भामग परिसरातील दांडकोट, तोते, देवीगढ, सुखाल घाटी आणि देवीपिंडी यांसारख्या गावांना या मार्गामुळे चांगली रस्ते जोडणी मिळणार आहे. या भागाकडे मागील अनेक वर्षांत दुर्लक्ष झाल्याने स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या रस्त्यामुळे या समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच जुन्या रस्त्यांच्या दुरुस्ती आणि सुधारणेलाही चालना मिळणार आहे. जम्मू विभागाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे मुख्य अभियंता पी. के. फोंसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८.३२५ किलोमीटर लांबीच्या या नव्या रस्त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा रस्ता बहुतांश नव्या मार्गाने तयार होणार असून, जुन्या रियासी-भामग रस्त्याचा काही भागही त्यात समाविष्ट केला जाणार आहे. दरम्यान, लड्डा आणि कोठरी ही गावे मुख्य परिक्रमा मार्गातून वगळण्यात आली आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने कैंथगल्ली (पंचेरी)-मोंगरी-लड्डा-तोते-दांडकोट-रियासी या खराब आणि अपघातप्रवण रस्त्याच्या सुधारणेसाठी स्वतंत्र प्रकल्प तयार केल्याचा दावा केला आहे.

मार्गावर ९ देवींची मंदिरे उभारणार

रियासीजवळील ग्रान मोर येथून या परिक्रमा मार्गाची सुरुवात होईल. तेथून गोरता, दांडकोट, तोते, देवीगढ, सुखाल घाटी आणि देवीपिंडीमार्गे हा रस्ता उधमपूर-कटरा मार्गावरील पंथलजवळ जोडला जाणार आहे. या गोलाकार मार्गावर विविध ठिकाणी नऊ देवींची मंदिरे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी रस्त्यालगतची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT