पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणा राज्यामध्ये सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवादी यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षल्यांचा खात्मा केली. याची माहिती मुलुगुचे एसपी डॉ. सबरीश यांनी दिली. याचे अधिकृत ट्वीट 'एएनआय' वृत्तसंस्थेने सोशल मिडीया एक्स हँडलवर शेअर केले आहे. (Telangana Naxalite Encounter )
या चकमकीत येलांडू-नरसंपेट क्षेत्र समितीचा कमांडर बद्रू उर्फ पपण्णा ठार झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या चकमकीबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजधानी रायपूरमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात सतत मोहीम चालवण्याबाबत बोलले होते. 2026 पर्यंत नक्षलवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्याचे लक्ष्य त्यांनी दिले होते. त्या संदर्भात छत्तीसगड पोलिस सातत्याने मोहीम राबवत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत 96 चकमकी झाल्या आहेत. त्यापैकी 8.84 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या 207 नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.