Assembly elections | निवडणुकीत 650 कोटींचा मुद्देमाल जप्त 
राष्ट्रीय

Assembly elections | निवडणुकीत 650 कोटींचा मुद्देमाल जप्त

निवडणूक आयोगाची कारवाई; रोकड, मद्याचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आगामी विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने कडक पवित्रा घेत देशभरात व्यापक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल 650 कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध रोकड, दारू, अमली पदार्थ आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, निवडणूक प्रक्रियेतील पैशांचा प्रभाव रोखण्याचा ठोस प्रयत्न दिसून येत आहे.

निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक व्हाव्यात, यासाठी आयोगाने 5,000 हून अधिक फ्लाईंग स्क्वॉड आणि 5,200 स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स तैनात केल्या आहेत. तक्रारींवर 100 मिनिटांत कारवाई करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक जप्ती व्यवस्थापन प्रणालीद्वारे (ईएसएमएस) सर्व कारवायांचे डिजिटल ट्रॅकिंग केले जात असून, प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आयोगाने सर्व राज्यांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देत ‘भयमुक्त, प्रलोभनमुक्त आणि पारदर्शक निवडणूक’ हे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे.

कारवाईत काय सापडले?

निवडणूक असलेल्या 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात एकूण 53.2 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर सुमारे 29.63 लाख लिटर दारू ज्याची किंमत सुमारे 79.3 कोटी रुपये आहे, जप्त केली आहे. याशिवाय 230 कोटींचे अमली पदार्थ, 58 कोटींचे मौल्यवान धातू, 231 कोटींचे मोफत वाटप साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्यनिहाय मोठी कारवाई

पश्चिम बंगाल - 319 कोटी (सर्वाधिक)

तामिळनाडू - 170 कोटी

आसाम - 97 कोटी

केरळम - 58 कोटी

पुद्दुचेरी - 7 कोटी

SCROLL FOR NEXT