Pakistan Fighter jet x
राष्ट्रीय

Pakistan Air Force Losses | चार दिवसांत पाकिस्तानची 6 फायटर जेट्स, 2 टेहळणी विमाने जमिनदोस्त; भारतीय हवाईदलाचा पराक्रम

Pakistan Air Force Losses | भारताचा 300 किलोमीटरवरून अचूक हल्ला; अनेक ड्रोन, 30 हून अधिक क्षेपणास्त्रे केली नष्ट, पाकची रडार सिस्टम पाडली ठप्प

Akshay Nirmale

Operation Sindoor Indian Air Force Strike Pakistan Fighter Jets Shot Down Surveillance Aircraft Destroyed

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील महिन्यात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या चार दिवसांच्या हवाई संघर्षात पाकिस्तानला प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

भारताच्या वायुदलाने (Indian Air Force) या कारवाईत पाकिस्तानचे 6 फायटर जेट्स, 2 महत्त्वाची निगराणी विमाने, एक C-130 ट्रान्सपोर्ट विमान, 30 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि अनेक ड्रोन सिस्टम्स उद्ध्वस्त केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

'इंडिया टुडे'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. ऑपरेशनल डेटाचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर हे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यानुसार हवाई लढती दरम्यान पाकिस्तानचे 6 फायटर जेट्स भारतीय हल्ल्यांमध्ये पाडले गेले आहेत.

भारताने 300 किलोमीटरवरून केला हल्ला

त्याचबरोबर, सुदर्शन क्षेपणास्त्र प्रणालीच्या वापरातून 300 किलोमीटर अंतरावर असलेले एक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर किंवा एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अ‍ॅन्ड कंट्रोल विमान उद्ध्वस्त करण्यात आले.

आणखी एक स्वीडिश बनावटीचे एअरबोर्न अर्ली वॉर्निंग विमान भोलारी एअरबेसवर केलेल्या हल्ल्यात नष्ट करण्यात आले.

हल्ल्याच्या वेळी या एअरबेसमध्ये फायटर जेट्स देखील उपस्थित होते, पण पाकिस्तानने अजून त्या परिसरातील मलबा हटवलेला नाही, त्यामुळे त्या संभाव्य नुकसानीचा अधिकृत समावेश करण्यात आलेला नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

भारताकडून हवाई क्षेपणास्त्रांचा वापर

भारतीय वायुदलाच्या रडार आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या फायटर जेट्सना लक्ष करत त्यांना रडारवरून अदृश्य होताना टिपले, हे देखील यशाचे एक महत्त्वाचे लक्षण ठरले.

तसेच, पाकिस्तानच्या पंजाब भागामध्ये एका ड्रोन स्ट्राईकमध्ये C-130 ट्रान्सपोर्ट विमान उद्ध्वस्त करण्यात आले.

या मोहिमेदरम्यान ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर न करता फक्त हवाई क्षेपणास्त्रांचा (air-launched cruise missiles) वापर करण्यात आला, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

राफेल, सुखोई-30 ची कामगिरी

एका संयुक्त कारवाईत राफेल आणि सुखोई-30 फायटर जेट्सने एका हॅन्गरवर हल्ला करत चीनी बनावटीचे 'Wing Loong' ड्रोन आणि 10 पेक्षा अधिक युझीएव्ही (unmanned combat aerial vehicles) नष्ट केले.

प्रचंड नुकसानामुळेच पाककडून शस्त्रसंधीची विनंती

पाकिस्तानकडून भारतातील विविध एअरबेसवर डझनावधी क्षेपणास्त्र (क्रूझ आणि बॅलिस्टिक) डागण्यात आली होती, पण भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने त्यातील बरीचशी निष्क्रिय केली.

ही लढाई 6 मेच्या रात्रीपासून 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई करत सुरू केली. हा संघर्ष 10 मे रोजी पाकिस्तानने शस्त्रसंधीची विनंती केल्यावर थांबला, कारण त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

दरम्यान, भारतीय वायुदल अजूनही या ऑपरेशनदरम्यान गोळा केलेल्या तांत्रिक व युद्धसंबंधी डेटाचे सखोल विश्लेषण करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT