नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशभरात गेल्या दोन दशकांत डेंग्यूबरोबरच चिकुनगुनियाचा डंखही तीव्र होत चालला आहे. चिकुनगुनियाच्या दीर्घकालीन परिणामांचा सर्वाधिक धोका भारताला असल्याने चिंता आणखी वाढली आहे. दरवर्षी जगभरातील सुमारे एक कोटी 44 लाख लोकांना चिकुनगुनियाचा धोका असून त्यामध्ये 51 लाख भारतीयांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम), नागासाकी विद्यापीठ आणि सियोल येथील आंतरराष्ट्रीय लस संस्थेच्या (आयव्हीआय) संयुक्त संशोधनातून समोर आली आहे.
तीव्र हवामान बदल, तापमानवाढ आणि पावसातील अनियमितता या गोष्टींमुळे भविष्यात चिकुनगुनियाचा प्रसार आणखी वाढू शकतो असा अंदाज देखील या अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. तसेच चिकनगुनिया नियंत्रणात आला नाही, तर येत्या काही वर्षांत जगातील एकूण चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येपैकी निम्म्याहून अधिक रुग्णसंख्या भारत आणि ब्राझीलमध्ये असेल असा धोका देखील व्यक्त केला आहे. डासांची उत्पत्ती (विशेषतः एडिस ईजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टोस), तापमान व पर्जन्यमानातील बदल, पर्यावरणीय परिस्थिती तसेच देशाचा आर्थिक स्तर (जीडीपी) या घटकांद्वारे मशीन लर्निंग आधारे हा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यात आला.