राष्ट्रीय

4 कोटी बालकांना गोवरचा धोका; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  गोवरच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नऊ महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना गोवर आणि रुबेला लसीचा एक अतिरिक्त डोस देण्याबाबत विचार करावा, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.

बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून गोवरचे वाढलेले रुग्ण आणि मुंबईतील उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राने रांची, अहमदाबाद आणि मलप्पूरम येथे तपासासाठी आणि प्रकरणांच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत करण्यासाठी पथके रवाना केली आहेत. महाराष्ट्राच्या प्रधान आरोग्य सचिवांसह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. गोवर रुग्णसंख्येची वाढ सार्वजनिक आरोग्याच्या द़ृष्टिकोनातून विशेष चिंतेची आहे, असे या पत्रात म्हटले आहे. मुंबईत गोवरच्या प्रादुर्भावाने नुकताच आठ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी एकूण मृत्यूची संख्या 12 होती.

4 कोटी बालकांना गोवरचा धोका : जागतिक आरोग्य संघटना

कोरोनाच्या काळात गोवरचे लसीकरण सर्वच देशांत मागे पडल्याने आज जगातील 4 कोटी बालकांना गोवरचा धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. गोवरसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालात दिलेला तपशील धक्कादायक आहे. जग एका महासाथीचा मुकाबला करण्यात व्यस्त असताना, इतर आजार व साथींकडे लक्ष देणे शक्य नव्हते त्याचा परिणाम आता वर्षभरानंतर दिसू लागला आहे. भारतात, खासकरून महाराष्ट्रात आणि मुंबईत गोवरचे रुग्ण आढळणे व रुग्णांचे मृत्यू होणे याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याने आरोग्य संघटनेच्या अहवालाचे महत्त्व अधोरेखित होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रोस घेब्रेईसस यांनी म्हटले आहे की, 2021 मध्ये जगभरात सगळ्याच देशांच्या आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या मुकाबल्यात व्यस्त होत्या. एकीकडे कोरोनाची लस विक्रमी वेळात तयार करणे आणि लसीकरण करणे, अशी अचाट कामगिरी होत असताना, इतर आजारांचे नियमित लसीकरण बाजूला ठेवले गेले. त्याचाच परिणाम म्हणून जगात ठिकठिकाणी गोवरच्या साथी येणे सुरू झाले आहे.

गोवरचा धोका लहान मुलांना अधिक असून, एक किंवा दोन्ही डोस चुकलेल्या मुलांना गोवरचा धोका दिसत आहे. 2021 मध्ये जगातील 18 देशांत गोवरच्या 6 कोटी 10 लाखांहून अधिक लसी देण्याचे टाळण्यात आले होते.

2001 ची आकडेवारी काय सांगते?

  • लागण झालेल्या बालकांची संख्या : 90 लाख
  • गोवरमुळे मरण पावलेल्यांची संख्या : 1.3 लाख
  • सर्वाधिक प्रभावित देशांची संख्या : 22
  • लसीकरण न झालेली बालके : 4 कोटी
  • पहिला डोस चुकलेली बालके : 2.5 कोटी
  • दुसरा डोस चुकलेली बालके : 1.4 कोटी
SCROLL FOR NEXT