वाॅशिंग्टन/टेक्सास; वृत्तसंस्था : इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या रॉकेटचा अनियंत्रित तुकडा बुधवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला. त्याचे वजन सुमारे चार टन आहे. ताशी ८,६९० किलोमीटर वेगाने जाऊन हा तुकडा आदळल्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठा खड्डा पडला आहेे. या धडकेमुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही, असे अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने स्पष्ट केले आहे.
हा अनियंत्रित तुकडा स्पेसएक्सच्या ‘फाल्कन ९’ रॉकेटचा वरचा भाग आहे. अमेरिका आणि जपानचे दोन लुनार लँडर अंतराळात पाठवण्यासाठी जानेवारी २०२५ मध्ये फ्लोरिडा येथून त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. मोहीम पूर्ण झाल्यानंतर रॉकेटचा हा भाग अंतराळातच फिरत राहिला होता. ट्रॅकिंग डेटानुसार, या तुकड्याचा आकार एखाद्या इमारतीएवढा आहे.
आईन्सटाईन क्रेटरजवळ धडक
चंद्रावरील ‘आईन्सटाईन क्रेटर’जवळ ही धडक झाली. चंद्राचा हा भाग दिवसाच्या प्रकाशात असतो आणि पृथ्वीवरूनही दिसतो. मात्र, शास्त्रज्ञांच्या मते, धडकेच्या वेळचा प्रकाश अत्यंत क्षीण असल्यामुळे तो सामान्य दुर्बिणीतून पाहणे अशक्य होते. या धडकेमुळे चंद्रावर धुळीचा एक मोठा लोट उडाला असावा. तो १०० किलोमीटर उंचीवर गेला आणि अनेक मिनिटे टिकून राहिला असावा, असे मत केम्ब्रिज विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. मॅट बोथवेल यांनी व्यक्त केले आहे.
या धडकेचा शास्त्रज्ञांना काय फायदा होईल?
सायन्स म्युझियमच्या अंतराळ विभागाच्या प्रमुख लिब्बी जॅक्सन यांच्या मते, शास्त्रज्ञांसाठी हा एक अत्यंत रोमांचक प्रयोग आहे. कारण रॉकेटच्या तुकड्याचा वेग, वजन आणि आकाराचा डेटा आधीपासूनच उपलब्ध आहे. सामान्यतः जेव्हा एखादा नैसर्गिक उल्कापिंड चंद्रावर आदळतो, तेव्हा शास्त्रज्ञांकडे त्याचा प्राथमिक डेटा नसतो. या धडकेमुळे निर्माण झालेले नवीन खड्डे आणि उडालेल्या धुळीच्या थराचा अभ्यास करून अब्जावधी वर्षांपूर्वी चंद्र आणि आपल्या सूर्यमालेची निर्मिती कशी झाली, हे शास्त्रज्ञांना समजून घेता येईल, असे त्या म्हणाल्या. काही शास्त्रज्ञांना हायवेच्या (प्रचंड वेगाच्या) कॉस्मिक धडकेचा दुर्मीळ अभ्यास करण्याची ही संधी आहे.