पुढारी ऑनलाईन डेस्क: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर आज (दि.९) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. तर चकमकीत दाेन जवान शहीद झाले आहेत. तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. चकमकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म X वर पाेस्ट करत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी पाेस्टमध्ये म्हटले आहे की, "नक्षलमुक्त भारत बनवण्याच्या दिशेने, सुरक्षा दलांना छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत ३१ नक्षलवाद्यांना ठार मारण्यासोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली. आज आपण मानवताविरोधी नक्षलवादाचा अंत करताना आपले दोन शूर सैनिक गमावले आहेत. हा देश या वीरांचा नेहमीच ऋणी राहील. शहीद जवानांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.
"मी माझा संकल्प पुन्हा व्यक्त करतो की, ३१ मार्च २०२६ पूर्वी आपण देशातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करू. जेणेकरून देशातील कोणत्याही नागरिकाला त्यामुळे आपला जीव गमवावा लागू नये, असेही अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी २०२५ पर्यंत छत्तीसगड राज्यात वेगवेगळ्या चकमकीत ५० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून सुरक्षा दलांनी आतापर्यंत विविध चकमकींमध्ये २१९ नक्षलवादी ठार झाले आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. विष्णू देव साई यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळली. तेव्हापासून राज्यातील नक्षलविरोधी कारवाईला वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत राज्य नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे.