अनिल साक्षी
जम्मू : उत्तर काश्मीरमधील प्रसिद्ध गुलमर्ग केबल कार सेवेत सोमवारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ही रोप वे सेवा अचानक बंद पडल्यामुळे सुमारे 300 हून अधिक पर्यटक हवेतच अडकून पडले. त्यामुळे महिलांसह लहान मुले, वृद्ध पर्यटकांत भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत 184 जणांची सुटका केली होती. प्रशासनाने तातडीने बचाव मोहीम राबवली.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सेवा अचानक थांबल्यानंतर 65 केबिन हवेतच अडकून राहिल्या. प्रत्येक केबिनमध्ये सहा प्रवासी बसू शकतात. काही पर्यटक घाबरून रडू लागले, तर अनेकांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत भारतीय सैन्य, पोलिस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यांच्या संयुक्त पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
दरम्यान, या सेवेत नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची पथकेही घटनास्थळी तैनात केली आहेत. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गुलमर्ग रोप वे हा आशियातील सर्वात उंच आणि लांब केबल रोप वे मानला जातो. सुमारे 14 हजार फूट उंचीपर्यंत जाणारा हा रोप वे जगातील तिसर्या क्रमांकाचा सर्वाधिक उंचीवरील रोप वे आहे. गुलमर्ग ते कोंगडोरी आणि पुढे अफरावत शिखरापर्यंत जाणारा हा रोप वे काश्मीरमधील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.
भारतीय सैन्याच्या जवानांनी जीव धोक्यात घालून रोप वेच्या केबलवरून सरपटत केबिनपर्यंत पोहोचून पर्यटकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी दोरखंडांच्या सहाय्याने पर्यटकांना खाली उतरवण्यात आले, तर कमी उंचीवरील केबिनमधील लोकांना शिड्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सायंकाळपर्यंत 16 केबिनमधून 80 जणांची तर त्यानंतर आणखी कही मिळून एकूण 184 पर्यटकांची सुटका केली गेली. पण 25 केबिन्समध्ये पर्यटक अडकून होते. ऑपरेशन रात्रीपर्यंत सुरू राहिल.मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले.