Santhara Ritual
इंदूरमध्ये ब्रेन ट्यूमरग्रस्त एका तीन वर्षांच्या मुलीने 'संथारा' व्रताद्वारे प्राणत्याग केल्याची घटना समोर आली आहे. या मुलीच्या नावावर गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्रही जारी केले आहे.
सदर मुलीला एक वर्षापूर्वी ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान झाले होते. तिच्यावर मुंबईत उपचारही करण्यात आले. त्यानंतर जैन मुनीश्रींच्या सल्ल्यानंतर, मुलीच्या पालकांनी २१ मार्च रोजी तिला संथारा व्रत दिले. हा धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. त्यासाठी जैन समाजाने मुलीच्या पालकांचा सन्मानदेखील केला. हा सर्वात लहान वयात केलेले संथारा व्रत असल्याचा दावा करण्यात आलाय. यामुळे 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'नेही याची दखल घेतली.
जैन धर्मियांत उपोषण करून देहत्याग करण्याच्या विधाला ‘संथारा’ म्हटले जाते. जैन मुनी मोक्ष तसेच पुनर्जन्म मिळविण्यासाठी हे व्रत करत असल्याचे सांगितले जाते. 'संथारा' ही जैन धर्मींयांमधील एक प्राचीन प्रथा आहे. ज्यात एखाद्या व्यक्तीला, आपली शेवटची वेळ असल्याचा भास झाल्यानंतर, अन्न, पाणी आणि संसारातील सर्व वस्तूंचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करते. जैन समुदायाच्या धार्मिक परिभाषेत, संथाराला "सल्लेखना" आणि "समाधी मरण" असेही म्हटले जाते.
सदर मुलीचे पालक माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात काम करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी एका जैन मुनींच्या प्रेरणेने त्यांच्या एकुलत्या एका मुलाला संथारा व्रत देण्याचा निर्णय घेतला.
अवघ्या तीन वर्षांच्या वयात या व्रतामुळे प्राणत्याग करणाऱ्या वियाना या मुलीचे वडील पियूष जैन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, "माझ्या मुलीला या वर्षी जानेवारीत ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिच्या तब्येतीत सुधारणा झाली. पण मार्च महिन्यात तिची प्रकृती पुन्हा बिघडली. तिला खाण्यापिण्यासही त्रास होऊ लागला."
ते पुढे म्हणाले की, २१ मार्च रोजीच्या रात्री ते त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या गंभीर आजारी मुलीला घेऊन जैन संत राजेश मुनी महाराज यांच्या दर्शनासाठी गेले. "महाराजांनी माझ्या मुलीची गंभीर अवस्था पाहिली. त्यांनी आम्हाला सांगितले की, मुलीचा अंतिम क्षण जवळ आला आहे. तिने संथारा व्रत करणे आवश्यक आहे. जैन धर्मींयामध्ये या व्रताला खूप महत्त्व आहे. आम्ही खूप विचार केल्यानंतर निर्णय घेतला."
जैन मुनींनी सांगितलेला संथारा धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या मुलीने प्राण त्यागले. मुलीच्या वडीलाने असेही पुढे सांगितले की, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या मुलीच्या नावे जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र जारी केले आहे. ती जैन विधींनुसार संथारा व्रत पाळणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती बनली असल्याचा दावाही त्यांनी केला.
वियाना ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. मुलीची आई वर्षा जैन म्हणते, "माझ्या मुलीला संथारा व्रत ग्रहण करण्याचा निर्णय आमच्या कुटुंबीयांसाठी किती अवघड होता हे मी शब्दांत सांगू शकत नाही. माझी मुलगी ब्रेन ट्यूमरमुळे खूप त्रस्त होती. तिला होत असलेला त्रास पाहणे माझ्यासाठी खूप वेदनादायी होते."
मुलीच्या आठवणीने भावूक झालेली तिची आई म्हणाली, "माझी मुलगी पुढच्या जन्मात नेहमीच खुश राहावी अशी माझी इच्छा आहे."
या प्रथेवरुन याआधी वादही निर्माण झाला होता. २०१५ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) अंतर्गत संथारा प्रथा दंडनीय गुन्हा असल्याचा निर्णय दिला होता. या प्रथेवर बंदी घालण्याच्या निर्णयावर धार्मिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, जैन समाजाच्या विविध धार्मिक संस्थांनी या निर्णयाविरोधात याचिका दाखल केल्या. या याचिकांवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती.