पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलिस चौकीवर ग्रेनेडने हल्ला करणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत तीन खलिस्तानी दहशतवाद्यांना उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात सोमवारी (दि.२३ डिसेंबर) पहाटे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले. उत्तर प्रदेश (UP Police) आणि पंजाब पोलिसांनी (Punjab Police) ही संयुक्त कारवाई केली. गुरविंदर सिंग (वय २५), वीरेंद्र सिंग (२३) आणि जसप्रीत सिंग उर्फ प्रताप सिंग (१८) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही खलिस्तान कमांडो फोर्स या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित होते. पंजाब पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत त्यांना मारण्यात आले. या तीन खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस चौकीवर हल्ला केला होता. या प्रकरणी तिघेही पोलिसांना हवे होते. त्यांच्याकडील दोन एके-४७ रायफल, दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.
पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "उत्तर प्रदेश आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाक पुरस्कृत खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या संयुक्त कारवाईदरम्यान पोलिस आणि तीन मॉड्यूल सदस्य यांच्यात चकमक झाली. या दहशतवादी मॉड्युलचा गुरदासपूरमधील पोलीस चौकीवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहभाग आहे. यातील जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी पुरणपूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. त्यांच्याकडून दोन एके रायफल्स आणि दोन ग्लॉक पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत."
पंजाब पोलिसांच्या एका पथकाने पिलीभीत पोलिसांना पुरनपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत तीन खलिस्तानी दहशतवादी असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली. पुरणपूर येथे तिघेजण संशयास्पद वस्तूंसह असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींनी घेरले. या कारवाईदरम्यान सोमवारी पहाटे झालेल्या चकमकीत तिघेजण मारले गेले.
"या शोध मोहिमेदरम्यान आरोपींनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. त्याला पंजाब पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात तिघेही ठार झाले. पंजाब पोलिसांच्या पथकाने त्यांच्या परदेशी कनेक्शनविषयी माहिती दिली होती. या संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे,” असे पिलीभीत पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.