लखनौ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेंतर्गत फॉर्म भरण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (26 डिसेंबर) संपली. यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र आता ती वाढवण्यात आलेली नाही. सध्याच्या मतदार यादीतील 15.44 कोटी नावांपैकी सुमारे 2.89 कोटी नावे वगळली जाणार आहेत, तर 1.11 कोटी मतदारांना नोटीस पाठवली जाणार आहे.
मतदार यादीचे वेळापत्रक 31 डिसेंबर 2025 : कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. 30 जानेवारी 2026 : या यादीवर हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख. फेब्रुवारी 2026 : अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.जर या यादीत तुमचे नाव नसेल, तर तुम्हाला आक्षेप किंवा दावा प्रक्रियेतून जावे लागेल.
मोहिमेची पार्श्वभूमी : उत्तर प्रदेशात ही मोहीम 4 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली होती. सुरुवातीला एका महिन्याचा वेळ देण्यात आला होता; परंतु काम पूर्ण न झाल्यामुळे आधी एक आठवडा आणि नंतर 26 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली. 15 दिवसांच्या अतिरिक्त मुदतीमुळे राज्यात सुमारे 2 लाख नवीन मतदारांची भर पडली आहे.31 डिसेंबर रोजी निवडणूक आयोग मसुदा यादी प्रसिद्ध करेल, त्यानंतर मतदारांना त्यांचे नाव यादीत आहे की नाही, हे पाहता येईल.
स्थलांतरित : 1.26 कोटी मतदार उत्तर प्रदेशातून कायमचे बाहेर गेले आहेत.
मृत्यू : 45.95 लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे.
दुबार नावे : 23.32 लाख मतदारांची नावे दोनदा आहेत.
पत्ता न लागलेले : 84.20 लाख मतदारांचा पत्ता लागलेला नाही.
फॉर्म न भरलेले : 9.37 लाख लोकांनी प्रपत्रे जमा केलेली नाहीत.