27 Naxalites killed in encounter at chhattisgarh abujhmad narayanpur
छत्तीसगड : पुढारी वृत्तसेवा
छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत जवळपास २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. खात्मा करण्यात आलेल्या नक्षल्यांमध्ये वरिष्ठ नक्षली कमांडरचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड भागात आज (बुधवार) सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान २७ माओवादींचा खात्मा करण्यात यश आले आहे.
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांमध्ये नक्षलविरोधी कारवाई तीव्र करण्यात आली होती. या कारवाईत ३१ नक्षलवादींना ठार केल्यानंतर काही दिवसांनी आता पुन्हा नक्षलविरोधी अभियानात पुन्हा २७ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे.
नारायणपूर जिल्ह्यात ही चकमक झाली, जिथे एक वरिष्ठ नक्षलवादी कमांडर परिसरात आश्रय घेत असल्याची विश्वसनीय गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य सुरक्षा बलांनी संयुक्त मोहीम सुरू केली होती. नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव या चार शेजारच्या जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) तुकड्यांच्या कर्मचाऱ्यांनी या हल्ल्यात समन्वय साधला आणि संयुक्तरित्या ही मोहिम राबवल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले.
छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागात पसरलेला अबुझमाड हा एक दुर्गम आणि मोठ्या प्रमाणात नक्षलग्रस्त असलेला वनक्षेत्राचा भाग आहे. हा भाग बऱ्याच काळापासून नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अबुजमाडचा मोठा भाग नारायणपूरमध्ये आहे आणि तो विजापूर, दंतेवाडा, कांकेर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पसरलेला आहे.
नारायणपूर बिजापूर आणि दंतेवाडा येथे डीआरजीच्या टीमचे सकाळपासून संयुक्त ऑपेरेशन सुरु होते. सकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीमध्ये २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.