राष्ट्रीय

देशभर चार दिवसांत 20 पाकिस्तान्यांना अटक

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : शहराबाहेरील जिगणी परिसरात तीन दिवसांपूर्वी 8 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार बंगळूर ग्रामीण जिल्हा पोलिसांनी देशभरात छापे घालून बुधवारी 12 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या 20 झाली आहे. त्यांनी कर्नाटकात सणासुदीच्या काळात घातपात घडवण्याचा कट रचला असण्याची शक्यता असून, सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर खात्याने दिला आहे.

जिगणीतील कारवाईनंतर पाकिस्तानी नागरिकांना बोगस कागदपत्रे तयार करून देणारा परवेझ नामक संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. त्याच्या चौकशीतून आणखी काहीजणांना त्याने बोगस कागदपत्रे दिल्याचे उघडकीस आले. आणखी काही पाक नागरिक देशातील विविध भागांमध्ये बेकायदेशीरपणे राहत असल्याचा सुगावा पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हैदराबाद, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये बंगळूर ग्रामीण जिल्हा पोलिसांनी छापे घालून 12 जणांना अटक केली. आणखी काही पाकिस्तानी नागरिक देशातील विविध ठिकाणी लपल्याची शक्यता आहे. ते सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. अटकेतील पाक नागरिकांकडून माहिती मिळवून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

गुप्तचरांचा सतर्कतेचा इशारा

पाकिस्तानी नागरिकांच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यात सतर्कतेचा इशारा केंद्रीय गुप्तचर खात्याने दिला आहे. आयुध पूजा, विजयादशमी आणि त्यानंतर दिवाळी सण येत आहे. अशावेळी काही संघटनांकडून विध्वंसक कृत्यांची शक्यता आहे. म्हैसूरमध्ये दसरोत्सव सुरू आहे. जंबो सवारीवेळी लाखो लोकांची उपस्थिती असते. अशावेळी शांतता भंग करण्यासाठी घातपात घडवून आणण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT