राष्ट्रीय

Lok Sabha MP Education : 18व्या लोकसभेतील खासदार किती शिकलेले आहेत? जाणून घ्या आकडेवारी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha MP Education : देशातील नुकत्याच निवडून आलेल्या 18व्या लोकसभेतील एकही खासदार निरक्षर नाही. नवनिर्वाचित 543 खासदारांपैकी बहुतांश उच्चशिक्षित आहेत. सुमारे 80 टक्के खासदारांनी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) ने ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, लोकसभा निवडणुकीत स्वतःला निरक्षर घोषित करणारे सर्व 121 उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

नवीन खासदारांमध्ये 147 पदवीधर

अहवालानुसार, सुमारे 105 (19 टक्के) विजयी उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता 5वी आणि 12वी दरम्यान असल्याचे घोषित केले आहे. 147 उमेदवार पदवीधर आहेत आणि तेवढेच उमेदवार पदव्युत्तर आहेत. 28 जणांनी डॉक्टरेटपर्यंत शिक्षण घेतले आहे. 34 खासदार 10वी पास आणि 65 खासदार 12वी पास आहेत. 4 खासदारांनी 8 वी पर्यंत तर 2 खासदारांनी 5 वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

कोणत्या पक्षाचे किती खासदार सुशिक्षित आहेत?

भाजपच्या 240 खासदारांपैकी 64 पदवीधर आणि 69 पदव्युत्तर आहेत. 15 जणांनी डॉक्टरेटची पदवी मिळवली आहे. फक्त एक खासदार 5वी पास आहे. काँग्रेसचे सहा खासदार 10वी पास, 24 पदवीधर, 27 पोस्ट ग्रॅज्युएट आणि 4 डॉक्टरेट आहेत. काँग्रेसच्या एकाही खासदाराचे शिक्षण दहावीपेक्षा कमी नाही. अपक्ष म्हणून विजयी झालेल्या 7 उमेदवारांपैकी 4 उमेदवारांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

मागच्या लोकसभेपेक्षा किती वेगळे आकडे?

17 व्या लोकसभेत पदवीधर आणि त्याहून अधिक शिक्षण असलेल्या खासदारांची संख्या 396 होती. डॉक्टरेट पदवी असलेले सुमारे 21 खासदार होते. तर यंदाच्या लोकसभेत केवळ 22 टक्के म्हणजेच 119 खासदार असे आहेत, ज्यांचे शिक्षण उच्च माध्यमिक किंवा त्याहून कमी आहे. गेल्या लोकसभेत अशा खासदारांची संख्या 147 (27 टक्के) होती. 17व्या लोकसभेत पदवीधर खासदारांची संख्या 27 टक्के होती, ती 18व्या लोकसभेत 22 टक्के झाली आहे.

सर्वात श्रीमंत खासदार कोण?

श्रीमंत खासदारांमध्ये तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार डॉ चंद्रशेखर पेम्मासानी हे आंध्र प्रदेशातील गुंटूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांची संपत्ती 5,705 कोटी रुपये आहे. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगणातील चेवेल्ला मतदारसंघातील भाजपचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी आहेत, त्यांची संपत्ती सुमारे 4,568 कोटी रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर हरियाणाच्या कुरुक्षेत्रातील भाजप खासदार नवीन जिंदाल आहेत, ज्यांची संपत्ती 1,241 कोटी रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT