राष्ट्रीय

जयपूरच्या रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर १८ रुग्णांची द़ृष्टी गेली

दिनेश चोरगे

जयपूर; वृत्तसंस्था :  राजस्थानमधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या सवाई मान सिंग (एसएमएस) या जयपूरमधील रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर अठरा रुग्णांची एका डोळ्यातील द़ृष्टी गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्वांवर राजस्थान सरकारच्या चिरंजीवी आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

एका रुग्णाने सांगितले की, माझ्या डोळ्यावर 23 जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. 5 जुलैपर्यंत मला सर्व काही व्यवस्थित दिसत होते. मात्र, 6-7 जुलैपर्यंत द़ृष्टी गेली. त्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचासुद्धा कसलाही उपयोग झाला नाही. द़ृष्टी कमी होण्यामागचे कारण संसर्ग असल्याचे मला डॉक्टर म्हणाले. आता संसर्ग बरा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही रुग्णांनी डोळ्यात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना रुग्णालयात पुन्हा दाखल होण्यास सांगितले. तथापि, त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करूनही त्यांची द़ृष्टी परत आली नाही. विशेष म्हणजे, यातील काहींवर दोनपेक्षा जास्त वेळा शस्त्रक्रिया झाल्या. त्यादेखील अयशस्वी ठरल्या.

अधिकार्‍यांनी ठेवले कानांवर हात

हा मुद्दा गंभीर होत चालल्याचे दिसून येताच रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील अधिकार्‍यांनी आमच्याकडून कसलीही चूक झालेली नाही, असा दावा केला आहे. आता सरकारनेच याचा तपास सुरू केला आहे.

SCROLL FOR NEXT